एखाद्या बालकलाकाराला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून मालिकेची कथा पुढे न्यायची म्हटले म्हणजे मग आपल्याला ‘गोटय़ा’, ‘बोक्या सातबंडे’ अशा मालिकांची आठवण होते. मध्यंतरीच्या काळात अशा मालिका पाहण्याचा योगच प्रेक्षकांना आला नव्हता. हा योग प्रेक्षकांसाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने जुळून आणला आहे. मालिकेतील छोटय़ा-छोटय़ा कुटुंबातील मोठय़ा मोठय़ा लढाया मिटविण्याची जबाबदारी आजवर आजी-आजोबांकडे होती. ‘स्टार प्रवाह’च्या ‘आंबटगोड’ या नव्या मालिकेतील ही जबाबदारी नातवावर टाकण्यात आली आहे. आणि या नातवाची भूमिका साकारणार आहे सक्षम कुलकर्णी. सक्षमला याआधी आपण अनेक चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून सक्षम अभिनय करताना पाहिले आहे. मात्र, मालिकेत मध्यवर्ती भूमिका करण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे.
 विद्वांस कुटुंबातील राया या नातवाची भूमिका सक्षम करतो आहे. ‘राया हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला सांभाळून घेणारा मुलगा आहे. अत्यंत प्रामाणिक आणि एखादी गोष्ट ठरवली की तो ती पूर्ण करणारच असा हा मुलगा आहे,’असे सक्षमने आपल्या भूमिकेविषयी बोलताना सांगितले. ‘या मालिकेची संकल्पना मला मनापासून आवडली होती. त्यात संजय मोने, वंदना गुप्ते, सुहास परांजपे, अभिजीत चव्हाण, विशाखा सुभेदार अशा एकापेक्षा एक सरस कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मला या मालिकेनिमित्ताने मिळत होती. त्यामुळे पहिलीच टीव्ही मालिका, त्यात विनोदी भूमिका आणि चांगल्या टीमबरोबर कामाची संधी अशा सगळ्या उत्तम गोष्टी या ‘आंबटगोड’मुळे माझ्यासाठी जुळून आल्या आहेत’, अशा शब्दांत सक्षमने आपला आनंद व्यक्त केला. ‘आंबटगोड’ मालिकेची संकल्पना, कलाकार आणि ज्ञानेश भालेकर-राजन वाघधरे ही दिग्दर्शकद्वयी यांच्यामुळे एक चांगली मनोरंजनाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार असल्याचेही त्याने सांगितले. एका बालकलाकाराला मध्यवर्ती भूमिका करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने मालिकेच्या निर्मात्यांचे आभार मानले. चित्रपटातून आपला ठसा उमटवल्यानंतर आता छोटय़ा पडद्यावरही आपल्या अभिनयाची ‘आंबटगोड’ धमाल दाखवण्याची संधी आपण अजिबात दवडणार नसल्याचेही त्याने सांगितले.    

Story img Loader