गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन दिवाळीतही न मिळाल्याने सोलापूर महापालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना अक्षरश: शिमगा करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नावर लक्ष वेधूनदेखील महापालिका पदाधिकरी व प्रशासनाने बेदखल केल्यामुळे अखेर परिवहन कर्मचाऱ्यांना संपाचा बडगा उगारावा लागला आहे. या संपामुळे शहरातील प्रवासी बससेवा ठप्प झाली असून ऐन दिवाळीत बसअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत. तर या संपामुळे ऑटो रिक्षांसह टांग्यांची ‘दिवाळी’ होत आहे.
दरम्यान, या संपामुळे परिवहन विभागाचे दररोजचे दहा लाखांप्रमाणे वीस लाखांचे नुकसान झाले. तर संप पुकारूनदेखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे. मनसेच्या अधिपत्याखाली परिवहन विभाग कर्मचारी संघटनेने या संपाची हाक दिली असून अन्य संघटना या प्रश्नी ‘चिडीचूप’ आहेत.
मुळातच आर्थिक डबघाईला आलेल्या पालिका परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगारच अदा झाला नाही. दिवाळीच्या तोंडावर हातात काही तरी मिळेल या अपेक्षेने कर्मचाऱ्यांनी वाट पाहिली. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे अखेर मनसेप्रणीत परिवहन कर्मचारी संघटनेने संप पुकारला. या संपाला सर्व कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असल्यामुळे बससेवा बंद पडली आहे.
कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा थकीत पगार अदा करावा तसेच दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान तथा उचल रक्कम मिळावी अशी मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी परिवहन समितीचे सभापती मल्लेश बडगू यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु त्याचा कसलाच परिणाम झाला नाही. उलट, यात सभापती बडगू हे स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप केला गेला. तर दुसरीकडे संप सुरू झाला तरी पालिका पदाधिकारी व प्रशासनाने परिवहन कर्मचाऱ्यांविषयी यत्किंचितही सहानुभूती न दाखविता उलट, ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेतली. त्यामुळे वातावरण चिघळले आहे.
दरम्यान, या पाश्र्वभूमीवर प्रभारी आयुक्त अशोक जोशी यांच्या दालनात मनसे पदाधिकारी व परिवहन कर्मचारी प्रतिनिधींची बैठक झाली. या वेळी आयुक्तांनी ठोस असा कोणताही निर्णय जाहीर न करता अगोदर बसेस सुरू करा, नागरिकांची गैरसोय टाळा, तुम्हाला थकीत वेतन अदा करण्याची व्यवस्था करतो, असे मोघम स्वरूपाचे आश्वासन दिल्यामुळे त्यावर मनसे पदाधिकारी व परिवहन कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे या संपाची कोंडी कायम राहिल्याचे दिसून येते.
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर आले असताना बससेवा बंद पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. बससेवा बंद असल्याचा लाभ ऑटो रिक्षांना होत असून घोडाटांग्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत.
दिवाळीत पगार नसल्याने परिवहन सेवकांचा संप
गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेले वेतन दिवाळीतही न मिळाल्याने सोलापूर महापालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना अक्षरश: शिमगा करण्याची वेळ आली आहे. या प्रश्नावर लक्ष वेधूनदेखील महापालिका पदाधिकरी व प्रशासनाने बेदखल केल्यामुळे अखेर परिवहन कर्मचाऱ्यांना संपाचा बडगा उगारावा लागला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-11-2012 at 03:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salary is not given to travel workers in diwali thats why they stoped working