पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असतानाच पाणी विक्रेत्यांनी पाण्याचे दर वाढविले आहेत. पाणीविक्रीच्या व्यवसायातून रोजची उलाढाल हजारोंच्या घरात होत असल्याची माहिती मिळते.
नांदेड शहरालगत अनेक वसाहतींमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा टंचाईच्या झळा जानेवारीपासूनच बसू लागल्या आहेत. तरोडा, वामननगर, छत्रपती चौक, लोकमित्रनगर, पंढरपूरनगर, वाडी, सांगवीसह अनेक भागात भूगर्भातील पाणीपातळीत कमालीची घट झाली. जानेवारीच्या प्रारंभीच अनेक कूपनलिका कोरडय़ा पडल्या आहेत. या भागांपैकी काही भाग महापालिका हद्दीत समाविष्ट असला, तरी तेथेही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गरज लक्षात घेऊन या भागातील अनेक जण पाणीविक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत.
एक हजार लिटर टाकी भरून देण्यास ३०० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. तीव्र टंचाई, इंधनवाढ व पाण्याची मोठी मागणी या पाश्र्वभूमीवर यंदा पाण्याचे दर वाढविल्याचे सांगण्यात येते. खासगी टँकरचालक नजीकच्या गावातील खासगी विहिरीतून हे पाणी आणतात.
जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात आजमितीस ४२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे; पण नांदेड शहरालगत तब्बल ४० ते ४५ खासगी टँकर पाणीविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. खासगी पाणीविक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश नाही. त्यामुळे त्यांची मनमानी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्य़ात पाऊस साधारणत: १५ जूनच्या पुढे पडतो. त्यामुळे खासगी टँकर चालकांची मनमानी आणखी चार महिने सहन करावी लागणार आहे, अशी हतबल प्रतिक्रिया या भागातील एका नागरिकाने व्यक्त केली.

Story img Loader