सुरज बडजात्या आणि सलमान खान यांची ‘केमिस्ट्री’ २५ वर्षांपूर्वी ‘मैने प्यार किया’च्या निमित्ताने जुळली. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये सलमान खान ‘नायक’म्हणून हिट ठरला. त्यानंतर १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’मध्येही सलमान खान होताच. सुरज बडजात्या आणि सलमान खान यांची इतक्या वर्षांची ही केमिस्ट्री आता पुन्हा एकदा ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना सलमान खानचा ‘डबल’ धमाका पाहायला मिळणार असून चित्रपटात सलमान दुहेरी भूमिकेत आहे.
कोणत्याही अभिनेत्याला दुहेरी भूमिका करणे नेहमीचे आव्हानात्मक वाटत असते. सलमाननेही ‘जुडवा’मध्ये दुहेरी भूमिका रंगविली होती. सर्वसामान्यत: दुहेरी भूमिकेतील एक व्यक्तिरेखा चांगली आणि एक वाईट अशा प्रकारची असते. मात्र ‘जुडवा’मध्ये सलमानच्या दोन्ही भूमिका चांगल्या व्यक्तिरेखेच्या होत्या. आता ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये दोन्ही भूमिका नेमक्या कशा आहेत? ते समोर आलेले नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने सलमानचा ‘डबल’ धमाका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘मैने प्यार किया’मध्ये सलमानचे नाव ‘प्रेम’ होते. सलमानला आणि चित्रपटालाही हे नाव लाभदाय ठरल्याने त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘हम आप के है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘बारातीया’ मध्येही त्याचे नाव ‘प्रेम’ होते. या नावाबरोबरच सलमानच्या अनेक चित्रपटात त्याचे नाव ‘विजय’असे होते. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटातील दुहेरी भूमिकेतील व्यक्तिरेखांनाही कदाचित ‘प्रेम’ आणि ‘विजय’ हीच नावे असण्याची शक्यता आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा सलमानबरोबर आहे. ‘सावरिया’नंतर ते दोघे पुन्हा एकदा या चित्रपटातून एकत्र काम करत आहेत. नील नितीन मुकेश, स्वरा भास्कर, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा, अनुपम खेर आदी कलाकार सलमानसोबत असून संगीत हिमेश रेशमियाचे आहे.

Story img Loader