आंबेडकर सूर्यकुळातील महाकवी, दलित पँथरचे नेते नामदेव ढसाळ यांचे नामांतर लढय़ानिमित्ताने औरंगाबाद शहराशी जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. या निमित्ताने पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ढसाळ यांना अभिवादन करण्यासाठी ‘पँथरला अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ढसाळ यांचे सहकारी ज. वि. पवार, पत्रकार बबन कांबळे, प्राचार्य राजाराम राठोड, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद ल. पाटील प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष गंगाधर गाडे असतील. या वेळी ढसाळ यांच्या कवितांवर आधारित एकांकिका ‘गांडू बगीचा’ सादर करण्यात येणार आहे. ढसाळ यांच्या कवितांचे नाटय़रूपांतर अमोल पाणबुडे यांनी केले असून दिग्दर्शन चरण जाधव, सहदिग्दर्शन श्वेता मांडे यांचे आहे. एकांकिकेत चरण जाधव, रावबा गजमल, असलम, संजय मघाडे, आशिष झाडके हे कलावंत आहेत. संगीत रुपेश परतवाघ व प्रकाशयोजना सुनील सौंदरमल यांची आहे. या एकांकिकेनंतर कविसंमेलन होणार असून बशर नवाज, डॉ. प्रतिभा अहिरे, विजयकुमार गवई, प्रा. डी. बी. जगतपुरिया, डॉ. ऋषिकेश कांबळे आदी सहभागी होणार आहेत. प्रा. समाधान इंगळे यांचे सूत्रसंचालन असेल. रविवारी (दि. २) सायंकाळी ६ वाजता तापडिया नाटय़मंदिरात हा कार्यक्रम होईल. परिवर्तनवादी जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवानंद वानखेडे यांनी केले आहे.

Story img Loader