महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची  जन्मशताब्दी  आज भावपूर्ण वातावरणात साजरी होताना महाराष्ट्राची अस्मिता म्हणून लौकिक असलेल्या या थोर नेत्याच्या ऐतिहासिक जन्मशताब्दी वर्षांचा समारोप झाला. कृष्णा, कोयनेच्या प्रीतिसंगमावरील स्वर्गीय चव्हाण यांच्या समाधीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ, उपाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमवेत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नीलमताई पाटील-पार्लेकर, कृषी सभापती किरण साबळे-पाटील, समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, शिक्षण सभापती संजय देसाई, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कराडच्या नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नूरजहाँ मूल्ला, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मोहनराव कदम, बबनराव यादव, दाजी पवार, राहुल चव्हाण, अतुल भोसले, सारंग पाटील, राजेश पाटील, तसेच पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन, जिल्हापोलीस प्रमुख के. एम. एम. प्रसन्ना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, कराडचे प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुधाकर भोसले, डॉ. अशोकराव गुजर आदी मान्यवरांसह यशवंतप्रेमी जनतेने यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन केले. दरम्यान, प्रीतिसंगमावरील हिरवळीत सुमारे १२ हजार विद्याथ्यार्ंनी वाहिलेल्या शब्दसुरांच्या श्रध्दांजली कार्यक्रमास वरील मान्यवरांनी हजेरी लावली.
या प्रसंगी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. त्यांचे विचार आणि कार्य निश्चितच मोलाचे असून, नव्या पिढीला प्रेरणादायी आहेत. चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्राला आधुनिक दृष्टी देऊन देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रशासनाची मजबूत घडी बसविण्याचे काम केले. देशाला व राज्याला नवी दिशा देण्याचे कार्य साधले.  त्यांनी कृषी, औद्योगिक व पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीसाठी केलेले काम अद्वितीय आहे. नव्या पिढीने यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून भावी जीवनाची वाटचाल करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. चव्हाणसाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त गेल्या वर्षभरातील कार्यक्रमांमध्ये त्यांचे विचार आणि कार्य तसेच समाजाला त्यांनी दिलेली दिशा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे आयोजन केले गेले.
अजित पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला. विचार आणि कार्यातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. नव्या पिढीने चव्हाण साहेबांचे विचार आणि कार्य डोळय़ासमोर ठेवून वाटचाल करावी. उत्तम लोकप्रतिनीधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण हे असून, त्यांच्या स्वप्नातील प्रगत महाराष्ट्र साकारणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.
दरम्यान, पी. डी. पाटील प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षांप्रमाणे आयोजित शब्दसुरांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात शहर परिसरातील १२ हजारावर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ‘यशवंत गौरव गीत’ सादर करून तसेच त्यानंतर देशभक्तीपर गीतांनी यशवंतराव चव्हाण यांना शब्दसुरांची भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

Story img Loader