डॉ.ए.जे.शेख आदर्श प्राचार्य पुरस्काराचे मानकरी
गोंडवाना विद्यपीठाचा पहिला आदर्श समाजभूषण पुरस्कार माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना तर आदर्श प्राचार्य पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.ए. शेख यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार यांनी बुधवारी रात्री उशिरा या पुरस्कारांची घोषणा केली.
डॉ. आईंचवार यांनी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त आदर्श प्राचार्य, समाजभूषण, शिक्षक व कर्मचारी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाने पहिला समाजभूषण पुरस्कार माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना जाहीर केला आहे. सवरेदय शिक्षण मंडळ, सरदार पटेल मेमोरिअल ट्रस्ट तसेच लोकसेवा व विकास संस्थेच्या माध्यमातून पोटदुखे समाजउपयोगी काम करीत आहेत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात मदत करण्यापासून तर त्यांचा उत्साह वाढविण्याचे मौलाचे काम ते करीत आहेत. यासोबतच त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना सुध्दा मदत केली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. पहिला आदर्श प्राचार्य पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.ए. शेख यांना जाहीर झाला आहे. शांताराम पोटदुखे यांनी दिलेल्या संधीनेच हा सन्मान मिळू शकला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वडिलांनी रूजविलेले संस्कार कामी आले. हा एकटय़ाचा नव्हे तर संपूर्ण महाविद्यालयाचा सन्मान असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. आईंचवार यांच्या तालमीत प्रशासकीय यंत्रणा चालविण्याचे धडे गिरवता आले. या सोबतच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने विविध आघाडय़ांवर काम करताना कधीच अडचण आली नाही. हे सर्वाच्याच सहकार्याने शक्य झाल्याची भावना डॉ. शेख यांनी व्यक्त केली. माझे वडीलच माझ्यासाठी आदर्श शिक्षक असून त्यांनी बालपणी रुजविलेले संस्कार कामात आले. हा पुरस्कार वडिलांना समर्पित करीत असल्याचेही डॉ. शेख म्हणाले.
आदर्श शिक्षक पुरस्कार ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे डॉ. अमीर ए. धम्मानी, गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप घोरपडे यांना जाहीर झाला आहे. आदर्श विद्यापीठ पुरस्कार अधिकारी वर्ग एक पुरस्कार मनीष झोडपे, अधिकारी वर्ग दोन राजेंद्र पांडुरंग पाठक, कर्मचारी वर्ग तीन देवेंद्र मेश्राम, कर्मचारी वर्ग चार भीमराव उराडे, आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार मोहन वनकर यांना तर आदर्श विद्यार्थी पुरस्कार संतोष छबीलदास सुरपाम यांना जाहीर झाला आहे. डॉ. प्रदीप घोरपडे हे शिवाजी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचे प्रमुख असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरही काम केले आहे. या पुरस्कारांचे वितरण २ ऑक्टोंबर रोजी विद्यापीठाच्या व्दितीय वर्धापन दिनाला केले जाणार आहे, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी दिली.

Story img Loader