वाढत्या महागाईच्या विषयावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राज्य व केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांवर महागाई लादली जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. असे असतानाही हे शासन ‘कृतिशील शासन’ म्हणून मिरवून घेत आहे. त्यांच्या योजना केवळ कागदावर असून कोणतीही रीतसर अंमलबजावणी होत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. दीड वर्षांपूर्वी डिझेलचे दर प्रतिलिटर ४५ रुपये होते. ते आज ६४.०५ रुपयांपर्यंत गेले आहेत. म्हणजे दीड वर्षांत ३५ टक्के वाढ झाली. गॅस सिलिंडरचीही तीच स्थिती आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे त्यामुळे अधिक हाल होत आहेत. राजीव गांधी योजना, संजय गांधी रोजगार योजना, आरोग्यदायी योजना, घरकुल योजना, जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना अशा प्रत्येक योजनेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. आंदोलनात पक्षाचे शहराध्यक्ष मसूद शेख, जिल्हाध्यक्ष मसूद जिलाणी, रंगा सोनवणे, राधेश्याम यादव, रमेश पाटील आदींनी सहभाग घेतला.

Story img Loader