परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठनिर्मितीस मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक यांनी विरोध केला होता. वसंतराव नाईकांचे नाव या कृषी विद्यापीठाला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केले. मराठवाडा कृषी विद्यापीठास वसंतराव नाईकांचे नाव देऊन विद्यापीठनिर्मितीच्या आंदोलनाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका करत संभाजी सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी नामांतराची घोषणा केली. एका विशिष्ट समाजघटकाला खूश करण्यासाठी नामांतराचा निर्णय घेतला. या निर्णयाला संभाजी सेना पूर्ण ताकदीनिशी विरोध करेल, असे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण सिरसाठ यांनी स्पष्ट केले. शनिवार बाजार येथून निघालेला मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
मराठवाडा कृषी विद्यापीठ हे मराठवाडय़ाच्या विद्यार्थी व जनतेच्या अस्मितेचे प्रतीक आहे. वसंतराव नाईक यांचे मराठवाडय़ाच्या विकासामध्ये कुठलेही योगदान नाही. वसंतराव नाईकांच्या कार्याचा गौरव करावयाचा असेल तर नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठास त्यांचे नाव द्यावे,
मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधींशी चर्चा न करता केवळ राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप संभाजी सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. नामांतराचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा संभाजी सेना भविष्यात संपूर्ण मराठवाडय़ात जनआंदोलन करून हा डाव हाणून पाडेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा