पत्नीच्या अपार कष्टामुळेच घराला घरपण येत असते. त्यामुळे हक्काच्या घरावर पती इतकाच पत्नीचाही अधिकार असणे आवश्यक आहे. त्यासाठीच घरकुल योजनेत पती इतकाच पत्नीलाही समान हक्क देण्यात आला आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल येथील घरकुल योजनेच्या गृहप्रवेश समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर घरकुल योजनेच्या २१६ लाभार्थ्यांनी यावेळी हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहप्रवेश केला.
याप्रसंगी नगराध्यक्षा माधुरी नाळे, उपनगराध्यक्षा नम्रता कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडे, भय्या माने आदी मान्यवर उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, जे गोरगरीब नागरिक बेघर आहेत त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने १००२ घरांची मंजुरी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत तीन इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. बांधण्यात येत असलेल्या घरकुल योजनेमध्ये दुकान गाळे, सांस्कृतिक हॉल, मंदिर यांचाही समावेश असणार आहे. नावनोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने घरकुलांची पूर्तता केली जाईल.
या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा म्हणून घरकुल उभारणीसाठी शासनाने गणेशनगर येथे जागा उपलब्ध करून दिली आहे, असे सांगून गरजूंनी लाभ घेण्यासाठी सत्य माहितीसाठी नाव नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी मुश्रीफ यांनी लाभार्थ्यांसह सहभोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, माजी नगरसेवक, लाभार्थी, नागरिक उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा