अखिल महाराष्ट्र नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत पुणे विभागातून समीर हम्पी आणि श्रीनिवास जरंडीकर यांनी एकत्ररीत्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना परिषदेचे माजी कार्यकारिणी सदस्य योगेश सोमण व नियामक मंडळाचे माजी सदस्य प्रकाश यादव यांनी निवडणुकीत पुन्हा न उतरता पािठबा जाहीर केला आहे. पुणे विभागाच्या १८ नाटय़ परिषद शाखांचा दौरा करून या जोडगोळीने उमेदवारीचे वेगळेपण पटवून देऊन विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.     
पुणे विभागात एकूण १३ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी सहाजणांची निवड नियामक मंडळात होणार आहे. निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन पॅनेलमधील साठमारी, वैयक्तिक टीकाटिप्पणी, व्यक्तिगत प्रचार या पाश्र्वभूमीवर जरंडीकर व हम्पी यांनी आपले वेगळेपण सांगण्यास सुरुवात केली आहे. काही सकारात्मक संकल्प सभासदांसमोर मांडले आहेत. मराठी नाटय़सृष्टीचे वैभव पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचविण्यासाठी ध्वनिचित्रफितींची निर्मिती, दुर्मिळ छायाचित्रे, संग्रहालये आदींचा समावेश असलेली पर्यटनस्थळे नाटय़पंढरी सांगली येथून विकसित करण्याचा त्यांचा आहे. स्वस्त नाटय़ योजना, राज्य स्पर्धा आयोजन, हौशी नाटय़संस्थांसाठी अन्य प्रसारमाध्यमांचे व्यासपीठ याची अंमलबजावणी करण्याचा त्यांचा निश्चय आहे.    
जरंडीकर १९८५ पासून प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असून लेखन, दिग्दर्शन व अभिनय या तिन्ही क्षेत्रांत, एकांकिका व राज्य नाटय़ स्पर्धाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रंगकर्मी गेल्या २० वर्षांत घडविलेले आहेत. आकाशवाणी सांगली केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या जरंडीकरांचे या क्षेत्रातील कार्यही सर्वश्रुत आहे. समीर हम्पी यांनी आपले वडील कुमार हम्पी यांचा नाटय़ व्यवस्थापनाचा व्यवसाय पुढे नेत व्यावसायिक नाटय़निर्मितीही केली आहे. रेशीमगाठी, संगीत सौभद्र, तेव्हाची ती आत्ताची मी या दर्जेदार नाटकांची निर्मिती त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा