एसटीच्या येथील आगारास गुरुवारी मंजुरी देण्यात आली. येत्या दोन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून येथे आगार सुरू करण्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी मान्य केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या पुढाकारातून बरीच वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. येथील आगाराच्या प्रश्नासाठी गुरुवारी मुंबईत आज पवार व पिचड यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगार व बसस्थानकाच्या नूतनीकरणासही मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, संभाजी राजेभोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र गुंड, धनंजय कोपनर, पक्षाचे तालुकाध्यक्ष जिल्हा सरचिटणीस अशोक जायभाय, व्यापारी आघाडीचे महेश जेवरे आदी या वैठकीला उपस्थित होते.
पिचड यांनी सुरुवातीलाच कर्जतला आगार मंजूर करण्याचा आग्रह धरला. कपूर यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांनी ही खर्चिक बाब असून महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता येथे आगर मंजूर करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. आगारासाठी येथे तातडीने दीडशे कामगार नियुक्त करणे गरजेचे असून त्यासाठी अंदाजपत्रात तरतूद नाही असे ते म्हणाले.
पवार यांनी ही बाब धुडकावून लावली. कर्जत हा आपला तालुका असल्याचे स्पष्ट करून तातडीने येते आगर मंजूर करण्याच्या सूचना करतानाच त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे कपूर यांनी लगेचच आगाराला मंजुरी दिली. याचवेळी पवार यांनी येथील बसस्थनकाच्या नूतनीकरणाच्याही सूचना दिल्या. आगारासाठी माजी आमदार राजीव राजळे यांनीही पवार व पिचड यांच्याकडे पाठपुरावा केला होता.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanctioned st depot to karjat