माढा तालुक्यातील शेवरे येथे भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटी लावून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर धाड घालण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर वाळूमाफियांनी हल्ला करून त्यांची सात वाहने फोडली व त्या पथकाला अक्षरश: पिटाळून लावले.
माढय़ाचे तहसीलदार रमेश शेंडगे हे मंडल अधिकारी ए. डब्ल्यू.काझी, चंद्रकांत हेडगिरी, संजय कसबे, तलाठी आर. आर. गुटाळ, बादशाह शेख आदींचे पथक घेऊन शेवरे येथे भीमा नदीच्या पात्रात बेकायदेशीर होत असलेल्या वाळूउपशावर कारवाई करण्यासाठी गेले होते. परंतु वाळूमाफिया व त्यांच्या हस्तकांनी या पथकांवर हल्ला केला. त्यांची सात वाहनांची मोडतोड केली. या वेळी दोन यांत्रिकी बोटींद्वारे सुमारे पाचशे ब्रास वाळूचा उपसा करण्यात आल्याचे आढळून आले. परंतु कारवाईसाठी पुढे येताच महसूल पथकावर हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी तलाठी बादशाह शेख यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गोरख मदन गायकवाड, गणेश दादासाहेब गायकवाड, दिनकर शिवाजी मस्के, कैलास मस्के, विजय मदन गायकवाड व उत्तरेश्वर गायकवाड आदी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी विजय गायकवाड यास रात्री अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ माढा तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी ‘लेखणी बंद’ आदोलन केले. तर या वाळूमाफियांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत करमाळय़ात महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

Story img Loader