कारंजा (लाड) पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांच्यावर सोमवारी दुपारी आखातवाडा परिसरात कारंजा (लाड) येथील वाळूमाफियाने हल्ला केला.
कारंजा (लाड) पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील आणि त्यांचे सहकारी आखातवाडा परिसरात छापा टाकण्यासाठी सोमवारी दुपारी जात असताना त्यांना एक ट्रॅक्टर रस्त्याने भरधाव येताना दिसला. पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांनी तो ट्रॅक्टर थांबवला. त्या ट्रॅक्टरमध्ये वाळू होती.
नितीन पाटील यांनी ट्रॅक्टरचालकास कमी वेगाने ट्रॅक्टर चालविण्यास सांगितले. ट्रॅक्टरचालकाने व मालकाने पाटील यांच्यासोबत अरेरावी करून ट्रॅक्टर अंगावर घातला. या घटनेची माहिती नितीन पाटील यांनी तात्काळ ठाणेदार नंदकुमार काळे यांना सांगितली.
ठाणेदार काळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. या प्रकरणी कारंजा पोलिसांनी कारंजा पालिकेचे नगरसेवक व बांधकाम सभापती बब्बू कासाब आणि त्यांच्या दोन मुलांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याच आरोपींविरोधात कारंजा पोलीस ठाण्यात गेल्या फेब्रुवारीत गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार काळे यांनी दिली. या घटनेने कारंजा पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून हल्लेखोर आरोपीस त्यांचे पाठीराखे ‘पुढारी’ कोणती मदत करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Story img Loader