तालुक्यातील मानेवाडी येथील वाळूतस्करांनी त्याच गावातील तीन शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली. बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध करू नये म्हणूनच ही दहशत निर्माण करण्यात आली.
वाळू माफियांच्या या मारहाणीत आबासाहेब अंकुश बारस्कर (वय २६), बाळू अंकुश बारस्कर (वय २२) व नाना महादेव बारस्कर (वय २०, सर्व राहणार मानेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. काल (शनिवार) सायंकाळी ही घटना घडली. भाजीपाला विकायला नेत असताना माने फाटय़ाजवळ या आरोपींनी रस्त्यात गाडय़ा अडवून गज, काठय़ा व केबलने बेदम मारहाण केली. या घटनेला महसूल व पोलीस खातेच जबाबदार आहेत असे फिर्यादी बाळु अंकुश बारस्कर यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, तालुक्यात भिमानदीच्या पात्रात राजरोस वाळू माफींया वाळु उपसा करीत आहेत. महसुल विभाग व पोलींसाशी या माफींयाचे अर्थपूर्ण संबध असल्याने ते कारवाई करीत नाहीत. मानेवाडी परिसरात भीमा नदीच्या फुगवटय़ाचे पाणी येते. या नदीपात्रातून रूपचंद नाना माने, अजय ज्ञानदेव कानगुडे, बाबा नाना माने अन्य काही वाळूमाफीया गेल्या सहा महिन्यांपासून राजरोसपणे वाळु उपसा करीत आहेत. या सर्वांच्या घरासामोर तस्करीतील वाळूचे साठे आहेत. त्यांच्याशी स्थानिक कामगार तलाठी व राशिनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे कोणी तक्रार केली तर हे कर्मचारी त्याचे नाव या तस्करांना सांगून दहशत निर्माण करतात.
आम्हाला मारहाण करूनही पोलीस मात्र त्यांची बाजू घेत असल्याची तक्रार बाळू बारस्कर यांनी केली. पोलिसांनी फिर्यादीत आरोपींची नावेही घेतली नाहीत, शिवाय आमच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. यासंदर्भात विचारणा केली असता पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही तक्रारी वरून अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती दिली.

Story img Loader