रेती उपशावर बंदी असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नाकावर टिच्चून डोंबिवलीजवळील कोपर, दिवा खाडी भागात सक्शन पंपांद्वारे मोठय़ा प्रमाणात अवैध रेती उपसा केला जात आहे. या रेती उपशामुळे खाडीचे पाणी रेल्वे मार्गात शिरण्याची भीती निर्माण झाली असून, डोंबिवली-दिवा रेल्वेमार्ग खचण्याची भीती व्यक्त होत आहे.  
रेती उपशासाठी रेल्वे मार्गालगतची जागा योग्य असल्याने या मार्गावर बिनधोकपणे रेती उपसा करीत आहेत. भरतीच्या वेळी खाडीच्या लाटा सतत रेल्वे मार्गालगतच्या भरावाला धडका देतात.  त्यामुळे या मार्गाखाली असणाऱ्या मातीच्या, दगडाचे भरावाचे स्खलन होत आहे. हळूहळू होणारी ही झीज रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयांच्या नजरेत येत नसली तरी एक दिवस खाडीचे पाणी आले धाऊन आणि रूळ गेले वाहून अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. कळवा, मुंब्रा, कल्याण, कोन परिसरात या रेती माफियांचे वास्तव्य आहे. मुंब््रयाच्या खाडीचा वाटेल तसा उपसा केल्यानंतर या रेती माफियांनी आता कोपर, दिवा मार्गाला आपले लक्ष्य केले आहे. यापूर्वी या परिसरातून लाखो ब्रास रेती, वाहने, पंप वेळोवेळी महसूल विभागाने जप्त केले आहेत. रेतीची वाढती गरज तसेच त्यामुळे सुरू असणारा काळाबाजार आणि चढय़ा भावाने विकली जाणारी रेती यामुळे मोठा नफा कमविण्यासाठी या भागातील माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आबासाहेब जऱ्हाड यांच्या जिल्हाधिकारीपदाच्या काळात कोपर पट्टय़ात माफियांनी सर्वाधिक धूमाकूळ घातला होता. जऱ्हाड यांनी या माफियांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जऱ्हाड यांची कारवाई तोंडदेखली असल्याचे पुढे स्पष्ट झाले. तेव्हाच आक्रमकपणे रेती माफियांना हिसका दाखविला असता तर कोपर, दिव्यात त्यांचा धुमाकूळ सुरूच झाला नसता, अशी चर्चा आता रंगली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी अधिकृत रेती उपशावर कडक र्निबध घातले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रेती उपसा कमी झाला आहे. अनधिकृत उपसा करणाऱ्या माफियांचा धुमाकूळ दिवसा कमी प्रमाणात असला, तरी रात्री आणि सरकारी सुट्टीच्या दिवसी ते अहोरात्र खाडी भागात रेती उपसा करीत असतात, अशा तक्रारी आहेत.

Story img Loader