शेतक-यांना मारहाण तसेच वाळू चोरीसंदर्भातील दोन गुन्ह्य़ांमध्ये पारनेर पोलिसांना हवा असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दौंड तालुकाप्रमुख राजाभाऊ तांबे याला पोलिस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी दौंड येथे आज ताब्यात घेतले.
दौंड तालुक्यातील मारहाणीच्या आरोपावरून तांबे हा यवत (ता. दौंड, जि. पुणे) पोलिसांच्या ताब्यात होता. त्याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार असल्याने पारनेर पोलिसांनी दौंड न्यायालयात तांबे याच्या प्रत्यापणासंदर्भात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तांबे याला पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यास मान्यता दिल्यानंतर स्वत: शिवरकर यांनी तांबे यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा शिवरकर आरोपीस घेऊन पारनेर पोलिस स्टेशनला पोहोचले.
मे महिन्यात वाळूने भरलेले ट्रक शेतातून घालण्यास मज्जाव केल्याच्या रागातून तांबे व त्याच्या साथीदारांनी शिवाजी काकडे व पोपट काकडे या शेतक-यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बेदम मारहाण केली होती. शेतक-यांना मारहाण झाल्यानंतर दुस-या दिवशी त्याचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शेतक-यांनी मुळा नदीपात्रात जाऊन तांबे याचा साथीदार असलेल्या वाळू ठेकेदाराची जेसीबी पोकलॅन व इतर वाहने पेटवून दिली होती. या वेळी शेतक-यांनी केलेल्या मागणीनुसार राहुरी व पारनेर येथील तहसीलदारांनी संयुक्तपणे पंचनामे केले असता ठेकेदाराने यांत्रिक उपकरणाच्या साहाय्याने पारनेर व राहुरी तालुक्याच्या हद्दीत हजारो ब्रास वाळूचे बेकायदेशीरपणे वाळूचे उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांनतर दोन्ही तहसीलदारांनी पारनेर व राहुरी येथे तांबे व त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हे दाखल केले होते. या दोन्ही घटनांनंतर पारनेर व राहुरी पोलिसांना तांबे व त्याचे इतर सहकारी हवे होते. दौंड तालुक्यातील गुन्ह्य़ात तांबे अडकल्याने तो आता अलगदपणे पारनेर पोलिसांच्या हाती लागला आहे. तांबे याला उद्या (बुधवारी) पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा