अण्णा हजारे प्रणित स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने जिल्ह्य़ातील वाळू तस्करीला तिन्ही मंत्र्यानाच जबाबदार धरले आहे. या तिघांचा वाळूतस्करीला वरदहस्त असल्याचा आरोप करून संघाचे पदाधिकारी शाम आसावा यांनी केवळ पर्यावरणाचीच नव्हे तर वाळूतस्करीने गावागावातील सामाजिक स्वास्थ्यही बिघडवून टाकले आहे असे सांगितले. दुष्काळाशी वाळू उपशाचा संबध आहे की नाही याचा तरी जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांनी जाहीर खुलासा करावा असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना आसावा यांनी वरीलप्रमाणे आरोप केले. स्नेहालयचे प्रमुख डॉ. गिरीष कुलकर्णी, अध्यक्ष सुवालाल शिंगवी आदी यावेळी उपस्थित होते. राजकीय नेते व महसूल अधिकाऱ्यांच्या भागीदारीतून वाळूतस्करांनी जिल्ह्य़ात हैदोस घातला असून त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत असे सांगून आसावा म्हणाले, सर्वच राजकीय पक्षांशी संबंधीत गुंड, गुन्हेगार वाळूतस्करीत उघडपणे सहभागी आहेत. वाळू तस्करीमुळेच दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा वारंवार सामना करावा लागतो, मात्र जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना या गोष्टीचे सुठलेही सोयरसुतक राहिलेले नाही. अपवाद वगळता एकाही लोकप्रतिनिधीने जिल्ह्य़ात वाळू तस्करीवर आवाज उठवला किंवा पाठपुरावा करून कारवाई केली असे दिसत नाही. वाळू तस्करांशी नेत्यांचे असलेले सबंध दाखवण्यास एवढीच गोष्ट पुरेशी आहे.
राजकीय नेते एकिकडे वाळू उपशाविरोधी भाषणे ठोकतात, मात्र त्यांचेच जवळचे कार्यकर्ते या व्यवसायात गुंतले आहेत. विशेषत: प्रवरानगर, संगमनेर व कोपरगाव तालुक्यातील नेत्यांनी न्यायलयात धाव घेऊन गावोगावचे वाळू लिलाव बंद करण्यास भाग पाडले, मात्र त्यांचेच कार्यकर्ते नंतर प्रवरा व गोदावरी पात्रीतील वाळू तस्करीत गुंतले आहेत. नेत्यांच्या संगनमाताशिवाय ही बाब शक्य नाही. संगमनेर, राहाता, श्रीगोंदे, राहुरी, पारनेर आदी तालुक्यात सर्रास हे प्रकार सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी महसूल यंत्रणाही वाळू तस्करांना मिळालेली असून या सर्वाच्या संगनमतानेच कारावई होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधीच राजकीय वजन वापरून त्यात अडथळे निर्माण करीत आहेत. काही महसूल अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे वाळू तस्करीला विरोध करून कारवाईचा प्रयत्न केला, मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांनाही कारवाई अध्र्यावर सोडून द्यावी लागली असा दावा आसावा यांनी केला. महसुलमंत्र्यांचा जिल्हा व त्यांच्या स्वत:च्या तालुक्यातही वाळू तस्करांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही असे ते म्हणाले.
लोकांसमोर राजकीय वैमनस्याचे नाटक केले जात असले तरी या धंद्यात मात्र पारंपारिक विरोधी नेत्यांचे समर्थक हातात हात घालून कार्यरत आहेत असा आरोप करताना आसावा यांनी प्रवरा पात्रातील हनुमंगाव, सात्रळ येथील वाळू तस्करांच्या नावांनिशी उदाहरणे दिली. जिल्हाधिकारी, विक्रीकर, आयकर या सरकारी खात्यांशी वेळोवेळी केलेला पत्रव्यवहारही त्यांनी सादर केला. आटकर विभागाला यातील आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याचे अधिकार असताना त्यांनी काही कारवाई तर केली नाहीच, मात्र संघटनेच्या एकाही पत्राची दखल घेतली नसल्याचे आसावा यांनी सांगितले. येत्या शुक्रवारी विक्रीकर व आयकर विभागाच्या कार्यालयांसमोर संघटना निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मंत्री, राजकीय नेते, महसूल यंत्रणा या सर्वाचे वाळू तस्करांशी असलेले लागेबांधे लक्षात घेऊन आता जनतेनेच वाळू तस्करांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे असे आवाहन आसावा यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा