सॅलिसबरी पार्क परिसरातील संपूर्ण संदेशनगर झोपडपट्टीचे ‘एसआरए’ योजनेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले असून झोपडपट्टीत राहणाऱ्या एकशेवीस कुटुंबांना रविवारी नव्या सदनिकांचा ताबा समारंभपूर्वक देण्यात येणार आहे. अतिशय दर्जेदार सदनिकांची निर्मिती येथे करण्यात आल्यामुळे ही इमारत एसआरए योजनेतील आहे, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
संदेशनगर प्लॉट क्रमांक १२ ते १५ ही घोषित झोपडपट्टी होती. गेली अनेक वर्षे ही झोपडपट्टी होती आणि मोलमजुरी करून कुटुंब चालवणारी शंभरावर कुटुंब येथे राहात होती. हे सर्व झोपटपट्टीवासीय प्रामुख्याने बीड, सोलापूर, उस्मानाबाद या भागातील आहेत. स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नातून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेअंतर्गत (एसआरए) याच झोपडपट्टीच्या जागी दहा मजली इमारत बांधण्यात आली असून या इमारतीत प्रत्येकी २७० चौरसफुटांच्या १२० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या सदनिका झोपडपट्टीवासीयांना देण्याचा कार्यक्रम रविवारी सायंकाळी होत असून आयुक्त महेश पाठक तसेच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी, आमदार माधुरी मिसाळ आणि अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या पुनर्वसन प्रकल्पाचे बांधकाम व विकसन लक्ष्मी डेव्हलपर्स आणि ओम इंजिनिअर्स अॅण्ड बिल्डर्स यांनी केले असून हे बांधकाम आयएसओ प्रमाणित आहे. प्रत्येक सदनिका २७० चौरसफुटांची असली, तरी बिल्टअप एरिया ४५० चौरसफूट इतका आहे. बांधकामासाठी अतिशय दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आला असून पाìकगसाठी प्रशस्त जागा, मोठा रस्ता, मोठे पॅसेज, दोन लिफ्ट, ऐंशी हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, सीएफएल दिवे, प्रत्येक सदनिकेत फर्निचर, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा, जनरेटर ही या बांधकामाची वैशिष्टय़ आहेत. पुढील पाच वर्षांसाठीचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही सुरुवातीलाच भरण्यात आला आहे.
या इमारताचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी सर्व कुटुंबांसाठी तात्पुरता निवारा देणारी घरेही बांधून देण्यात आली होती. या घरांमधून सर्व कुटुंब आता नव्या इमारतीत स्थलांतरित होत आहेत. ही दहा मजली इमारत बांधण्यासाठी सतरा महिन्यांचा कालावधी लागला, असे ओम इंजिनिअर्सचे ललित शहा यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. उत्कृष्ट गृहनिर्माण संस्था म्हणून महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक स्पर्धेत हा प्रकल्प पाठविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एसआरए योजनेत संदेशनगर झोपडपट्टीचे यशस्वी पुनर्वसन
सॅलिसबरी पार्क परिसरातील संपूर्ण संदेशनगर झोपडपट्टीचे ‘एसआरए’ योजनेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले असून झोपडपट्टीत राहणाऱ्या एकशेवीस कुटुंबांना रविवारी नव्या सदनिकांचा ताबा समारंभपूर्वक देण्यात येणार आहे.
आणखी वाचा
First published on: 24-11-2012 at 03:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandesh nager area redeveloped under sra scheme