संगमनेरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. नवीन वर्षांच्या प्रारंभी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने संगमनेरकरांची कित्येक वर्षांची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
सध्याचा पुणे-नाशिक रस्ता हा पूर्वीच्या शहराबाहेरूनच होता. मात्र महामार्गावर असलेल्या शहराची वाढ झपाटय़ाने झाली आणि हा रस्ता शहराच्या मध्यावर आला. याच रस्त्यालगत सह्याद्री विद्यालय व महाविद्यालय, संगमनेर महाविद्यालय, दंत महाविद्यालय अशा अनेक शिक्षण संस्था व अमृत उद्योग समूहातीलही विविध संस्था आहेत. पर्यायाने अवजड वाहतुकीसह शहरांतर्गत वाहतुकीचाही अतिरिक्त ताण रस्त्यावर आला. प्रवरेवरच्या अरुंद पुलाने व अवजड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार नित्याचे झाले. याशिवाय अपघातांचीही मालिका सुरू झाली. हा केवळ संगमनेरच्याच जिव्हाळ्याचा विषय होता असे नाही, तर संगमनेरमध्ये होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नाशिक-पुणेकरांनाही या प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळणार आहे.
या मार्गावर झालेल्या विविध अपघातांत महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांचे सर्वाधिक बळी गेले. शहरातील अनेक कुटूंबे आजही ही भळभळती जखम उराशी बाळगून आहेत. त्यामुळेच पर्यायी बाह्यवळण मार्ग व्हावा अशी शहरवासीयांची जुनीच मागणी होती. त्यासाठी वेळोवेळी रास्ता रोकोसारखी आंदोलनेही झाली. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न बराच काळ ताटकळत राहिला. भूसंपादनाचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, युवा नेते सत्यजित तांबे यांनीही दिल्लीत वेळोवेळी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर या दुपदरी रस्त्याला मंजुरी मिळाली होती. गेल्या वर्षी सुरू झालेल्या रस्त्याचे काम जानेवारी १४ मध्ये पूर्ण होणे नियोजित होते. त्यानुसार रस्ता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. नाशिककडून अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या मागील बाजूने सुरू झालेला बाह्यवळण मार्ग मूळ रस्त्याच्या पश्चिमेकडून जातो आणि संगमनेर खुर्द शिवारात पुन्हा मूळ रस्त्याला येऊन मिळतो. मार्गावर अनेक छोटेमोठे पूल व उड्डाणपूल आहेत. प्रवरा नदीवर सर्वात मोठा पूल आहे. दोन्ही बाजूने या पुलापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. पुलाचे कामही पूर्ण झाले असून त्यावर अखेरचा हात फिरविणे व डांबरीकरण बाकी आहे. महिनाअखेरपर्यत तेही होऊन नवीन वर्षांत संगमनेरकरांना ही भेट मिळण्याची चिन्हे आहेत.
गुंतवणूकदारांची पंचाईत
शहराबाहेरून नवीन रस्ता होत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गुंतवणूक करून जमिनी विकत घेतल्या. स्वस्तात मिळालेल्या जमिनी पुढे व्यवसायासाठी सोन्याच्या भावात विकल्या जातील अथवा नवीन व्यवसाय सुरू करता येईल अशी त्यामागची भूमिका होती. अनेक नवगुंतवणूकदारही यात सामील असून करोडोंची गुंतवणूक तेथे झाली आहे. मात्र रस्त्याच्या मूळ प्रस्तावाचा अभ्यास करून हा मार्ग भूसपाटीपासून दोन ते सात मीटर उंचीपर्यंत होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने त्याच वेळी प्रसिद्ध केले होते. ते तंतोतंत खरे ठरले असून, आता मात्र गुंतवणूकदारांची गोची झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा प्लॉटला ग्राहक मिळेनासे झाल्याने भाव गडगडण्याची चिन्हे आहेत.

Story img Loader