‘संघर्षमय भारत’ या वाड्मयीन मासिकांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय संघर्षमय साहित्य संमेलन शनिवार, ६ एप्रिलला बुलढाण्याच्या गर्दे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. आंबेडकरी विचारवंत डॉ.प्रदीप आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे, अशी माहिती मासिकाचे संपादक सागर समदूर यांनी दिली.
या संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता जलसंधारणमंत्री नितिन राऊत यांच्या हस्ते होणार आहे. बुलढाणा जिल्ह्य़ाचे माजी शल्यचिकित्सक डॉ.आर.जी. नरवडे यांच्यावर संपादित केलेल्या गौरव ग्रंथाचे यावेळी परिवाराच्या हस्ते प्रकाशन होईल.
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक दिल्लीचे डॉ.अनिल सुर्या यांना संघर्षमय भारतच्या वतीने राष्ट्रीय शाहु महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनीती’ या विषयावर डॉ. सरोज डांगे व प्रा.ग.ह.राठोड, प्रा.डॉ.वामन गवई इत्यादी वक्ते विचार व्यक्त करणार आहेत. दुपारी ३ वाजता अखिल भारतीय दलित नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.दत्ता भगत यांची प्रगट मुलाखत आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे केंद्रप्रमुख अमर रामटेक घेणार आहेत.
समारोपीय सत्रात ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक प्रा.डॉ.शत्रुघ्न जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.शिवाजी गजरे, माजी राज्य ग्रंथालय संचालक गणेश तायडे, आवाज इंडिया चॅनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन कांबळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, बुलढाण्याचे आमदार विजयराज शिंदे, आमदार संजय कुटे, आमदार राहुल बोंद्रे, विजय अंभोरे, हर्षवर्धन आगाशे, अमोल हिरोळे, प्रा.गोविंद गायकी प्रामुख्याने उपस्थितीत राहणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या संध्याकाळी भगवान भटकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. शिवनयन ठाकरे हे कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहे. कवी संमेलनात ५० पेक्षा जास्त कवी राज्यभरातून सहभागी होणार आहेत.
गर्दे वाचनालयाच्या परिसरास महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरी व साहित्य मंचास सरजाबाई गडवे असे नाव देण्यात आले आहे. या एक दिवशीय संघर्षमय साहित्य संमेलनास बहुसंख्य साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक सागर समदूर यांनी केले आहे.

Story img Loader