सांगली महापालिकेतील स्वीकृत आणि स्थायी सदस्यांच्या निवडी २० सप्टेंबर रोजी होणार असल्या तरी काँग्रेसने तीन नावांबाबत अद्याप मौन बाळगले आहे. काँग्रेसच्या तीन जागांसाठी चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांनी आपली मागणी पक्षाकडे नोंदविली असून राष्ट्रवादी व स्वाभिमानी विकास आघाडीने आपल्या वाटय़ाच्या दोन जागांची घोषणा केली आहे.
महापालिकेत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्याने काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अमर्याद झाली आहे. सदस्य संख्येच्या गणितानुसार स्वीकृत सदस्यासाठी पाच पकी तीन जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आहेत. या तीन जागांसाठी सांगली,मिरज आणि कुपवाड या तीनही शहराला प्रत्येकी एक जागा देण्याचा पक्षनेत्यांचा विचार आहे. मिरजेतून ५ जणांनी, सांगलीतून ३५ जणांनी आणि कुपवाड मधून ४ जणांनी स्वीकृत सदस्यासाठी पक्षाकडे मागणी नोंदविली आहे. काँग्रेसने तिघांची नावे प्रशासनाकडे दिली आहेत. मात्र, हे तिघे भाग्यवान कोण, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.
माजी महापौर इद्रिस नायकवडी यांची उमेदवारी शिक्षेच्या कारणावरुन महापालिका निवडणुकीवेळी फेटाळली गेली. त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात शिक्षेच्या स्थगितीसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी अखेर शिक्षेला स्थगिती मिळविली. त्यामुळे स्वीकृत सदस्य पदासाठी नायकवडी यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय बजाज आणि स्वाभिमानी विकास आघाडीने गौतम पवार यांना संधी दिली आहे.
स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा दि. २० सप्टेंबर रोजी  होत असलेल्या महासभेत महापौर करतील,असे काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी मंगळवारी सांगितले. दि. ६ सप्टेंबर  रोजी काँग्रेस सदस्यांची नावे प्रशासनाला कळविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महासभेतच स्थायी समिती सदस्यांची घोषणा होणार आहे. स्थायी समितीचे १६ सदस्य असून संख्याबळानुसार काँग्रेसच्या वाटय़ाला १०, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि स्वाभिमानी विकास आघाडीला २ जागा मिळणार आहेत. स्थायी समिती सदस्यांचीसुद्धा ऐनवेळी घोषणा केली जाणार असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.