नगरच्या महापालिकेत अपेक्षेप्रमाणे सहजगत्या राजकीय परिवर्तन झाले. महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप व उपमहापौरपदी काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर हे दोघेही बारा मतांनी विजयी झाले. दोघांना ६८ पैकी ४० मते मिळाली.
मनपाची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर सोमवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होऊन नवे सभागृह अस्तित्वात आले. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, नगर सचिव मिलिंद वैद्य यांनी त्यांना साहाय्य केले.
सुरुवातीला महापौरपदाची निवडणूक झाली. हात उंचावून मतदान घेण्यात आले. संग्राम जगताप यांना ४० आणि शिवसेनेचे अनिल शिंदे यांना २८ मते मिळाली. उपमहापौरपदासाठीही हेच संख्याबळ कायम राहिले. काँग्रेसच्या सुवर्णा संदीप कोतकर यांना ४० आणि भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे यांना २८ मते मिळाली. तत्पूर्वी उमेदवारीअर्ज मागे घेण्याच्या मुदतीत भाजपचे वाकळे यांनी महापौरपदाचा व शिवसेनेच्या दीपाली बारस्कर यांनी उपमहापौरपदाचा अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांसाठी सरळ लढत झाली. मनपाच्या दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच जगताप यांना दुस-यांदा महापौरपदाची संधी मिळाली.
शिवसेनेचे बंडखोर सचिन जाधव यांनी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचीच पाठराखण केली, तर भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविका सारिका भूतकर यांनी भाजपबरोबरच राहण्याचा निर्णय ऐनवेळी घेतल्याने युतीचे संख्याबळ २८पर्यंत गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४ नगरसेवकांसह उर्वरित सर्वच अपक्षांनी राष्ट्रवादीची पाठराखण केल्याने काँग्रेस आघाडी ४० अशा सुस्थितीत पोहोचली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा