महापौरपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने बुधवारी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा केली. उद्या (गुरुवार) ते हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
येत्या दि. ३० ला महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या (गुरुवार) शेवटची मुदत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादीने महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून संख्याबळातील आघाडी याही बाबतीत कायम राखली. उपमहापौरपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी सायंकाळी उशिरा काँग्रेसची बैठक सुरू झाली. तसेच हे दोन्ही उमेदवार ठरवण्यासाठी शिवसेनेची रात्री उशिरा बैठक बोलवण्यात आली होती.  
पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत महापौरपदासाठी जगताप यांच्या नावाची घोषणा केली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, आमदार अरुण जगताप, प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले आदी या वेळी उपस्थित होते.
श्रेष्ठींच्या सूचनेनुसार काकडे आज दुपारी नगरला दाखल झाले. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत महापौरपदासाठी जगताप यांचे नाव एकमताने निश्चित करण्यात आले. या बैठकीस वरील नेत्यांसह अंबादास गारुडकर, निर्मला मालपाणी, शारदा लगड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना काकडे यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, काँग्रेसने राष्ट्रवादीला उपहापौरपदाचा प्रस्ताव दिला असून तो तात्काळ मान्य करण्यात आला आहे. काँग्रेस आघाडीत पूर्वी ठरल्यानुसार ज्या पक्षाचे अधिक सदस्य त्यांचा महापौर आणि दुस-या पक्षाचा उपमहापौर या निकषावरच हा निर्णय घेण्यात आला आहे. मनपात राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष तर ठरला आहेच, मात्र अपक्षांसह अन्य नगरसेवकांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीने काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ४१ पर्यंत वाढवले आहे. त्यामुळे मनपात पुन्हा काँग्रेस आघाडीचीच सत्ता येणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे.
दरम्यान, मनपाच्या दहा वर्षांच्याच इतिहासात जगताप यांना अडीच वर्षांनंतरच दुस-यांदा महापौरपदाची संधी मिळाली आहे. मावळत्या महापौर शीला शिंदे यांच्या आधी तेच महापौर होते. त्या वेळी भाजप-शिवसेनेचे संख्याबळ मोठे असताना नंतरच्या मोर्चेबांधणीतील कौशल्यावर ते महापौर झाले होते. दुस-यांदा महापौरपदाची संधी मिळालेले ते एकमेव ठरतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा