शहरातील बहुचर्चित संग्रामनगर उड्डाणपुल दोन उद्घाटनांमुळे राजकीय वादात सापडला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) उद्घाटनाची तयारी सुरू असतानाच सोमवारी शिवसेनेने घाईघाईत या पुलाचे उद्घाटन उरकून टाकले. या निमित्ताने शिवसेनेने राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
उड्डाणपुलास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी करीत खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर कला ओझा, आमदार संजय शिरसाट, नगरसेवक राजू वैद्य, भाजपचे अतुल सावे व भागवत कराड यांच्यासह शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने सकाळीच पुलाजवळ धडक मारली. या वेळी पुलावर जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी लावलेले अडथळे दूर करून घोषणाबाजी व हाती भगवे झेंडे घेत पुलावर दुचाक्यांसह प्रवेश केला. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्याने पोलिसांचीही धावपळ झाली. सुमारे तास-दीड तास हे आंदोलन चालले.
राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या घरी आयोजित विवाह सोहळ्यानिमित्त केंद्रीय कृषिमंत्री पवार उद्या शहरात येत आहेत. याचे औचित्य साधून पवारांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचे जाहीर झाले होते. आमदार चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. मात्र, शिवसेनेने एक दिवस आधीच उद्घाटन करून राष्ट्रवादीला उघड आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा