नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियानामुळे रविवारची पहाट ही पनवेलकरांसाठी स्वच्छतेचा संदेश घेऊन येणारी ठरली. पनवेलच्या स्वच्छतेसाठी तब्बल सात हजार दासभक्तांनी सकाळी आठ वाजता या मोहिमेला सुरुवात केली. दासभक्तांनी नानांच्या शिकवणीचा आदर्श प्रशासन व रहिवाशांसमोर ठेवल्याने रविवारी स्वच्छ पनवेल पाहता आल्याची अनेक पनवेलकरांची प्रतिक्रिया होती.
पनवेल तालुक्याच्या स्वच्छता अभियानामध्ये रविवारी सकाळी आठ वाजता दासभक्तांनी हातामध्ये केरसुणी, फावडे, घमेला घेऊन मोहिमेची सुरुवात केली. कोणताही पुढारी या मोहिमेच्या उद्घाटनाला नव्हता. सुरू झालेल्या मोहिमेचा फोटो काढण्यासाठी छायाचित्रकार व पत्रकार येथे नव्हते. मला दिलेल्या परिसराची आज मला स्वच्छता करायची आहे हेच त्या दासभक्तांच्या मनात होते. गेल्या दोन आठवडय़ांपासून सर्व गावागावांतील व शहरात सुरू असणाऱ्या बैठकांमधून दासभक्तांना नियोजनाचे धडे निरूपणातून दिले गेले होते. आप्पांनी दिलेला श्रमदानाचा मार्ग हाच माझ्या जीवनाचा उत्कर्ष ठरू शकतो या विचाराने हजारो दासभक्त कामाला लागले होते. रविवारच्या मोहिमेमध्ये रस्त्यालगतचे व फुटपाथवर उगवलेले गवत, वर्षांनुवर्षे साचलेले मातीचे ढिगारे काढणारे दासभक्त पाहून सिडको, पनवेल नगर परिषद, पंचायत समिती, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकसहभागाची व्याख्या खऱ्या अर्थाने अनुभवली. सिडकोच्या सफाई कर्मचाऱ्यांची वेळ सात वाजण्याची असली तरीही हे कर्मचारी नेहमीप्रमाणे उशिरा कामावर हजर झाले. या मजुरांचे कंत्राटदार रविवार असल्यामुळे तासभर उशिराच अवतरले, परंतु दासभक्तांना रस्त्यावर पाहून कोणते काम करायला यांनी शिल्लक ठेवले, असा प्रश्न सिडकोच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवीन पनवेलमध्ये पडला होता. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया हे नवीन पनवेलमध्ये येऊन या मोहिमेमध्ये शामील होणार होते, मात्र ते रविवारी ध्यानधारणेच्या कार्यक्रमात व्यग्र असल्याने त्यांना येथे वेळीच पोहोचता आले नाही. त्यामुळे नवीन पनवेलमध्ये काही मिनिटांसाठी सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांनी केरसुणी हातामध्ये घेऊन पंचशीलनगर झोपडपट्टीसमोरील रस्ता झाडला. तेथे छायाचित्र घेण्याचा सोहळाही पार पडला. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगरसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. अनेक ठिकाणी छायाचित्र काढण्याचे काम जोरदार सुरू होते. दासभक्तांनी या मोहिमेला खऱ्या अर्थाने परिसर स्वच्छ केला होता.
१२ टन कचरा साफ केला
उरण – ज्येष्ठ निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना राज्यपालांनी स्वच्छतेचे दूत म्हणून जाहीर केल्यानंतर रविवारी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत दासभक्तांनी आपल्या एकीच्या जोरावर व हजारो हातांच्या साहाय्याने काही तासांतच उरण शहरातील १२ टनापेक्षा अधिक कचरा साफ केला. यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने सहा गट तयार करून शहराच्या वेगवेगळ्या भागांतून ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी उरण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची साथ घेण्यात आली होती. मात्र त्यापूर्वी मोहिमेची संपूर्ण रूपरेषा दासभक्तांनी आठवडाभर अगोदर तयार केली होती.
उरणमधील स्वच्छता मोहिमेची सुरुवात उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या उपस्थित करण्यात आली. या वेळी उरण नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश शिंदे, मुख्याधिकारी विनोद डवले, उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्यासह शासकीय अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सर्वसामान्य उरणकरही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. शहरासह अनेक गावांतूनही दासभक्तांनी स्वच्छतेची मोहीम राबवून गावेही साफ केली.
त्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने स्वत:चे साहित्य स्वत: घेऊन येऊन ही मोहीम राबविण्यात आली. नगरपालिकेच्या वतीने कचरा उचलण्यासाठी पोकलेन, जेसीबी तसेच भरण्यासाठी डंपरची व्यवस्था करण्यात आलेली होती. या मोहिमेमुळे उरण शहर अगदी टापटीप दिसत होते. त्यामुळे राबणारे हात असतील आणि इच्छा असेल तर काय घडू शकते याचे उदाहरणच या मोहिमेतून घालून दिले. या मोहिमेत महिला व पुरुषांनीही हिरिरीने भाग घेत शहरातील गटारे, रस्त्यावरील कचरा साफ केल्याने ‘सुंदर उरण स्वच्छ उरण’ काय असते हे उरण शहरातील नागरिकांना रविवारी अनुभवायला मिळाले. दररोज उरण नगरपालिकेच्या वतीने सहा टन कचरा साफ केला जातो, तर रविवारच्या सफाई मोहिमेत दुप्पट कचरा साफ करण्यात आला. या मोहिमेत तीन हजारांपेक्षा अधिक दासभक्तांनी सहभाग घेतला होता.
नवी मुंबई चकाचक
नवी मुंबई -डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी नवी मुंबईत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. या स्वच्छ अभियानाची सुरुवात वाशी रेल्वे स्थानकातून करण्यात आली. या वेळी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रतिष्ठानचे ३ हजार ५३१ सदस्य स्वच्छता सामग्रीसह सहभागी झाले होते. नवी मुंबईचे महत्त्वाचे रस्ते, अंतर्गत रस्ते, गावगावठाणातील रस्ते, रस्त्यावरील दुभाजक, पदपथ तसेच वाशी, नेरुळ, जुईनगर, कोपरखरणे, रबाले रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ करून एकूण २१६ किमी रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. या वेळी १३० टनाहून अधिक कचरा तुभ्रे क्षेपणभूमीवर जमा केला. स्वच्छता अभियानात खासदार राजन विचारे, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक तसेच विविध राजकीय नेते, आतंरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे सहभागी झाले होते.
दासभक्तांचा स्वच्छतेचा आदर्श
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियानामुळे रविवारची पहाट ही पनवेलकरांसाठी स्वच्छतेचा संदेश घेऊन येणारी ठरली.
First published on: 18-11-2014 at 06:06 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitation by dasbhakt