सिंहस्थात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी विविध पातळ्यांवर नियोजन सुरू असले तरी अल्पावधीत शौचालय व्यवस्थेचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. यंदा सिंहस्थात नाशिकमध्ये पर्वणीच्या काळात किमान ८० लाख तर त्र्यंबकेश्वरमध्ये २५ लाख भाविक व साधू-महंत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने अस्तित्वातील आणि प्रस्तावित, साधुग्राम व छोटेखानी शौचालयांच्या सीटची संख्या २२,६३२ पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. सिंहस्थ काळातील शौचालय व्यवस्थेच्या नियोजनासाठी सर्वेक्षण झाले असले तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. अल्प काळात भल्यामोठय़ा ‘सॅनिटेशन प्लॅन’ची अंमलबजावणी कशी होणार, हा प्रश्न आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुख्य ध्वजारोहण १४ जुलै रोजी होणार आहे. म्हणजेच कुंभमेळ्याला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून रखडलेली विविध विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे. सिंहस्थ काळात शौचालय व्यवस्थेचे नियोजन पूर्णत्वास नेणे ही बाब प्रशासनाची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. मागील सिंहस्थाच्या तुलनेत यंदा भाविक व साधू-महंतांच्या संख्येत दुपटीने वाढ होणार आहे. गत वेळी नाशिकमध्ये अधिकतम ५० लाख तर त्र्यंबकेश्वर २० लाख भाविक दाखल झाले होते. यंदा ही संख्या अनुक्रमे ८० लाख ते एक कोटी आणि २५ ते ३० लाखावर जाईल असा अंदाज आहे. भाविक व साधू-महंतांची ही संख्या गृहीत धरून २२,६३२ इतक्या सीटची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मागील सिंहस्थात हा आकडा ५६०० सीट होता. सद्य:स्थितीत अस्तित्वातील सार्वजनिक शौचालयात ५५८३, प्रस्तावित सुलभ शौचालय (सुलभ इंटरनॅशनल) २८५, साधुग्राम (तात्पुरती शौचालये) १०, ७८४ तसेच पोर्टेबल टॉयलेट्सच्या माध्यमातून ५९८० सीटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील छोटेखानी शौचालये आणि मुतारीची व्यवस्था कुठे कुठे करावयाची आहे, ती ठिकाणे सर्वेक्षणाद्वारे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार शहरातील वाहनतळे (बाह्य व अंतर्गत) या ठिकाणी १०५० छोटेखानी शौचालये तर २५० मुतारी, भाविक मार्ग व गोदाघाट परिसरात २८५० छोटेखानी शौचालय आणि २५० मुतारी, पालिका हद्दीत राखीव ४०० शौचालय आणि ५० मुतारी तर शहराबाहेरील बाह्य वाहनतळांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग ६०० शौचालय व २१० मुतारी असे नियोजन आहे. या माध्यमातून एकूण ५२२० छोटेखानी शौचालये आणि ७६० मुतारींचे नियोजन असून याद्वारे ५९८० सीट उपलब्ध होणार आहेत.
महापालिका हद्दीत बाह्य वाहनतळ तीन व सहा अंतर्गत वाहनतळ, भाविक मार्ग, गोदावरी घाट, साधुग्राम आणि राखीव अशा ५९ ठिकाणी पुरुषांसाठी २०७५ तर महिलांसाठी २२२५ शौचालयांची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. यातील काही शौचालये सिव्हर लाइनला तर काही साठवण टाकीला जोडावी लागणार आहेत. या कामास बराच वेळ लागणार आहे. या कामास अद्याप मुहूर्त लागलेला नाही. या संदर्भात पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी एजन्सीची नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले. हा विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. स्थायीची मान्यता मिळाल्यानंतर या कामास सुरुवात होणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले. सिंहस्थाला प्रारंभ होण्यास शिल्लक असणारा कालावधी लक्षात घेतल्यास शौचालय व मुतारी उभारणीचे हे काम कसे पूर्णत्वास जाईल याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा