सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ७ ब च्या पोटनिवडणुकीत भाजपने आपली जागा कायम राखताना प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव केला. या दोन्ही पक्षांच्या पराभूत उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली. भाजपचे संजय बसप्पा कोळी हे आपले प्रतिस्पर्धी रिपाइंचे अजित गायकवाड यांच्यापेक्षा ३१९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले.
नवनिर्वाचित नगरसेवक संजय कोळी यांना सर्वाधिक २१०७ मते पडली. तर प्रतिस्पर्धी अजित गायकवाड यांच्या पारडय़ात १७८८ मते पडली. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका लता फुटाणे व काँग्रेसचे केदार म्हमाणे यांच्यासह बसपाचे माजी नगरसेवक बबलू गायकवाड, काँग्रेसचे बंडखोर गौतम कसबे आदी ८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु फुटाणे (८५० मते) व काँग्रेसचे म्हमाणे (२३१ मते) यांच्यासह अन्य पाच उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढवली. बसपाचे गायकवाड यांना ९५६ मते मिळाली, तर काँग्रेसचे म्हमाणे यांच्यापेक्षा बंडखोर गौतम कसबे यांना जादा म्हणजे १३३६ मते पडली. त्यामुळे काँग्रेसचा बार फुसका निघाला.
बुधवार पेठ, चंडक बगिचा, मराठा वस्ती, बागले वस्ती यांचा समावेश असलेल्या या प्रभागातून मागील २०१२ सालच्या पालिका निवडणुकात राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेविका लता फुटाणे यांचा पराभव करून भाजपचे अनंत जाधव हे निवडून आले होते. परंतु नंतर एका खूनप्रकरणात अडकून जाधव यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यामुळे जाधव हे पालिका सभागृहात वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्दबातल ठरले. या रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी एकूण ११ हजार ७३० पैकी ७४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क (६३.१० टक्के) बजावला होता. सोमवारी सकाळी मतमोजणी होऊन अवघ्या तासाभरात निकाल जाहीर झाला. या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सोलापुरात प्रथमच नकारात्मक मतदानाचा (नोटा) हक्क उपलब्ध झाला असता ५१ मतदारांनी नकारात्मक मतदान केले.
सोलापूर पालिका पोट निवडणुकीत भाजपचे संजय कोळी विजयी
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ७ ब च्या पोटनिवडणुकीत भाजपने आपली जागा कायम राखताना प्रतिस्पर्धी काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव केला.
First published on: 17-12-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay koli of bjp won in by election of solapur municipal