गोरेगावच्या मतदान मोजणी केंद्रात उत्तर-मध्य, उत्तर आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी सुरू झाली. ‘आप’च्या कायकर्त्यांनी पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या घातलेल्या असल्याने त्यावरून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीने वातावरण थोडे गरम झाले. उत्तर मुंबईच्या मतमोजणीत पहिल्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे संजय निरूपम यांनी अल्पशी का होईना अनपेक्षित आघाडी घेतल्याने थोडीशी उत्सुकता निर्माण झाली. पण लगेचच पुढच्या फेऱ्यांमध्ये केवळ ‘मोदी’लाटेचा प्रभाव दिसू लागला आणि मतमोजणीसाठी आलेल्या काँग्रेसच्या संजय निरूपम यांनी परतीचा मार्ग धरला.  
‘आप’-भाजप कार्यकर्त्यांच्या बाचाबाचीमुळे मतमोजणी थोडी लांबणीवर पडली. पहिल्या टप्प्याच्या मतमोजणीसाठी १०.३० वाजले. त्यामुळे काही काळ कार्यकर्त्यांना ताटकळत राहावे लागले. पण त्यानंतरची मतमोजणी सुरळीत पार पडली. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी मात्र सकाळपासून केंद्रावर हजर होते. इतकेच नव्हे तर त्यांनी केंद्रावर उपस्थित पत्रकारांशी संवादही साधला. गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच आघाडी मिळाल्याने आणि ती सतत कायम राहत असल्याने निकालाबद्दलची उत्सुकता ताणली गेली नाही. गोपाळ शेट्टी, निरूपम यांनी सकाळीच मतमोजणी केंद्रावर हजेरी लावली असताना प्रिया दत्त, गुरूदास कामत हे उमेदवार मतमोजणी केंद्राकडे फिरकलेच नाहीत. निकालाचे स्वरूप स्पष्ट झाले तसे दुपारी पूनम महाजन आपल्या कुटुंबियांसह मतमोजणी केंद्रावर आल्या. राहुल महाजनही त्यांच्यासोबत होते. कार्यकर्त्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. गोपाळ शेट्टीच्या कार्यकर्त्यांनीही निकाल अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच विजयाची खात्री पटल्यावर दुपारी दीडच्या सुमारास लाडू वाटप सुरू केले.