लोकसभा निवडणुकीत कणकवलीपासून नवी मुंबईपर्यंतचे सर्व दादा संपले आहेत. शिवसेनेने त्यांना संपवले आहे. त्यामुळे शिवसेनेला कुणी दादागिरी शिकवू नये. कारण शिवसेनाच महादादा आहे, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात नुकताच आयोजित करण्यात आलेल्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.
दिल्लीमधील महाराष्ट्र भवनाची इमारत सुंदर आहे. मात्र महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीचा तिथे सन्मान राखला जात नाही. साधे पाण्यासाठीही विचारले जात नाही. अशी वागणूक मिळूनही इतर गप्प बसतील तर आम्ही गप्प बसणाऱ्यापैकी नाही हे शिवसेनेने दाखवून दिले असल्याचे सांगत राऊत यांनी विचारे यांची पाठराखण केली. यापुढे महाराष्ट्र सदनात जाऊन तिथे राहता येत नसेल, चांगल्या सुविधा मिळत नसतील तर संबंधितांच्या गचांडीला धरून बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला.
सध्या निर्माण झालेल्या भगव्या वातावरणाची पोटदुखी इतरांना झाली असल्याची टीका त्यांनी केली. जेवण कसे बनवतात हे पाहण्यासाठी तिथे गेलो. यावेळी जमिनीवर चपात्या लाटताना दिसून आले. त्यामुळे आम्हाला खायला घातली जात असलेली एक चपाती घेऊन आपण तेथील कामगाराला चारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना घडून एक आठवडा झाल्यांनतरही त्या विरोधात सभागृहात गोंधळ घातला जात असल्याची खंत राजन विचारे यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, शिवचरित्र व्याख्याते नितीन बानगुडे, अभिनेते शरद पोंक्षे आदी मान्यवर उपस्थित हेाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut spoke in vashi melava