स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून सानपाडा येथील भर नागरी वस्तीत मशिदीसाठी भूखंड वितरित करण्याचा निर्णय आता सिडको प्रशासनाच्या अंगलट येऊ लागला असून या नियोजित मशिदीविरोधात हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने या भागातील वातावरण तंग बनू लागले आहे. सानपाडा सेक्टर-आठ येथील नागरी वसाहतीत एका मुस्लीम संघटनेस सिडकोने मशिदीसाठी हा भूखंड वितरित केला आहे. प्रार्थनास्थळासाठी भूखंडांचे वितरण करताना स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्यात आलेले नाही, असे येथील रहिवासी संघटनांचे म्हणणे असून या निर्णयाविरोधात सानपाडय़ातील रहिवाशांनी सिडको भवनावर नुकताच एक मोर्चा काढला होता.
मागील तीन महिन्यांपासून सानपाडा भागातील रहिवाशांचे प्रार्थनास्थळासाठी वितरित केलेल्या या भूखंडांविरोधात आंदोलन सुरू असताना सिडकोचे वरिष्ठ अधिकारी त्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. मात्र बुधवारी सायंकाळी हजारोंच्या संख्येने रहिवाशांनी सिडको भवनावर धडक दिल्याने नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी हे वितरण रद्द करण्यात येईल, असे लेखी आश्वासन येथील रहिवाशांना दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी भूखंड वितरणाची संपूर्ण प्रक्रिया रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशा इशारा येथील रहिवाशी संघटनांनी दिला आहे.
आंदोलनाची पाश्र्वभूमी
सानपाडा भागात मोठय़ा संख्येने हिंदू वस्ती असताना या भागात मशिदीचा भूखंड वितरित केला जाऊ नये, अशी मागणी येथील वेगवेगळ्या रहिवासी संघटनांनी सिडकोकडे केली होती. असे असताना सेक्टर आठ या मध्यवर्ती ठिकाणी मशिदीसाठी भूखंड देण्यात आल्याने मागील तीन महिन्यांपासून या भागातील वातावरण गढूळ बनले आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सानपाडय़ातील रहिवासी संघटनांनी एकत्र येऊन एक दिवसाचा बंद पाळला होता. यासाठी नाक्यानाक्यावर फलक लावण्यात आले होते. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून पोलिसांनी हे फलक काढून टाकले. त्यामुळे रहिवासी अधिकच नाराज झाले आहे. सानपाडय़ातील हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाच्या झेंडय़ा खाली होत नसून वेगवेगळ्या वसाहतींमधील रहिवासी संघटना यासाठी एकत्र आल्या आहेत. मात्र, नवी मुंबई पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी आणि सिडकोतील काही पदाधिकारी हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी रहिवाशांवर दबाव वाढवत होते. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये अस्वस्थता व्यक्त होत होती. सिडकोने आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी येथील रहिवासी महासंघाने डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सिडको भवनावर एक मोर्चा नेला. त्या वेळी येथील रहिवाशांना चर्चेसाठी आमंत्रित करून लोकांच्या भावनांचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र भूखंड वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याने बुधवारी येथील रहिवाशांनी मोठय़ा संख्येने सिडको भवनावर मोर्चा नेला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सानपाडा भागातील रहिवासी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे स्वरूप पाहून भूखंडांचे वितरण रद्द करण्याचे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी दिले आहे.