केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची माहिती मंत्रालयाच्या वेब पोर्टलवर संकलित करण्याचे काम सुरू असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालयांनी यासाठी दिरंगाई चालवल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महाविद्यालयांना आता विद्यापीठाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सर्व महाविद्यालयांची माहिती वेब पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी ही माहिती त्वरित अपलोड करावी, असे सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्याना कळवण्यात आले, पण बहुतांश महाविद्यालयांच्या प्राचार्यानी त्यांच्या महाविद्यालयांशी संबंधित माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर अजूनही अपलोड केलेली नाही. ही माहिती अपलोड करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर होती. ती आता २० नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे. कळस म्हणजे, अनेक विद्यापीठांच्या प्राचार्याना ही माहिती अपलोड करण्याविषयीची माहितीच नसल्याचे दिसून आले आहे, तर अखेर मुदत संपल्यावर विद्यापीठालाही जाग आली आहे. पोर्टलवर माहिती अपलोड करण्यासंदर्भात प्राचार्याना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या ९ नोव्हेंबरला विद्यापीठात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रणही सर्व प्राचार्याना पाठवण्यात आले आहे.
मुळात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या सव्रेक्षणात विद्यापीठाशी संबंधित सर्व महाविद्यालयांची माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. शैक्षणिक सुधारणांच्या या प्रवाहात अमरावती विद्यापीठाशी संबंधित अनेक महाविद्यालये मात्र मागे पडली आहेत. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एकाच ठिकाणाहून महाविद्यालयांमध्ये सुरू असलेले विविध अभ्यासक्रम, सोयी-सुविधांविषयी माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये अपुऱ्या सोयी आहेत. त्या उघड होऊ नयेत, याचीच अधिक काळजी घेण्यात व्यवस्थापन व्यस्त असते, असा अनुभव आहे. आता विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याना कडक इशारा दिला आहे. कार्यशाळेला प्राचार्यानी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित रहावे आणि महाविद्यालयांची माहिती पोर्टलवर अपलोड करावी, अन्यथा त्याची सर्व जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असे विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
येत्या ९ नोव्हेंबरला होणारी कार्यशाळा दिवसभर असून बुलढाणा जिल्ह्य़ासाठी दुपारी १२ ते १२.४५, वाशीम जिल्ह्य़ासाठी १ ते १.४५, यवतमाळ जिल्ह्य़ासाठी २.४५ ते ३.३०, अकोला जिल्ह्य़ासाठी ३.४५ ते ४.३० आणि अमरावती जिल्ह्य़ासाठी ४.४५ ते ५.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला उच्च शिक्षण विभागाचे पुणे येथील सहसंचालक डॉ. नरेंद्र कडू, सांख्यिकी अधिकारी भीष्म बिरासदार आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सांख्यिकीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. राजेश सिंह मार्गदर्शन करणार आहेत.