येत्या महिन्याभरातच सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता लोकांसाठी खुला करण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून महिना लोटला, तरी या रस्त्याची सद्यस्थिती आणि शिल्लक असलेले काम पाहता आणखी किमान महिना-दीड महिना तरी हा रस्ता सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे ‘लवकरच’ हा रस्ता खुला होणार असल्याचा मुंबई महानगर रस्ते विकास प्राधिकरणाचा दावा पोकळ ठरण्याची चिन्हे आहेत.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडणारा आणि पश्चिम उपनगरातील लोकांना लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत अल्लद आणून सोडणारा सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता अनेक कारणांमुळे रखडला होता. या रस्त्यावरील उड्डाणपुल मध्य आणि हार्बर मार्ग ओलांडून जात असल्याने तो उभारण्यासाठी मध्य रेल्वेला विशेष ब्लॉक्स घ्यावे लागले. त्यात अडचणी आल्याने या रस्त्याचे काम अधिकच लांबले. मात्र तीन महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेने रात्रीचे ब्लॉक्स घेतल्याने या रस्त्याच्या पूर्ततेला वेग आला. १२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहार उन्नत मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात येत्या महिन्याभरात हा सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ताही सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर गेल्या गुरुवारी, १३ मार्च रोजी एमएमआरडीएने हा मार्ग लवकरच खुला करणार असल्याचे स्पष्ट केले.मात्र या मार्गावर अद्याप अनेक कामे बाकी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मार्गावरून कुर्ला स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उतरण्यासाठी दोन मार्गिका दिल्या आहेत. मात्र यापैकी कुर्ला स्थानकाजवळ नेहरू नगरमध्ये उतरणारी मार्गिका रस्त्याला लागते, तेथे अद्याप रस्ता तयार व्हायचा आहे. या रस्त्याचे खोदकाम सध्या सुरू असून त्यानंतर त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याच भागात भारतातील पहिला डबलडेकर पूल आहे. मात्र या पुलाच्या दोन्ही स्तरांवरील रस्ते अद्याप पूर्णपणे तयार झालेले नाहीत.
हार्बर मार्गावर चेंबूर स्थानकाआधी हार्बर मार्ग ओलांडून हा जोडरस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र या पुलाचे फक्त खांबच उभे राहिले असून त्यावर गर्डर टाकण्याचे काम अद्याप झालेले नाही. तसेच हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्गाला मिळतो, तेथेही अद्याप रस्त्याचे काम गर्डरावस्थेतच आहे. या रस्त्यांवर डांबर टाकणे, ते रस्ते वाहनांसाठी योग्य स्थितीत करणे, ही कामे अद्याप बाकी आहेत. या रस्त्यावर एकही दिवा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे दिव्याचे खांब उभारण्याचे कामही अद्याप सुरू झाल्याचे दिसत नाही. प्रत्यक्ष डबलडेकर पुलाच्या वरच्या बाजूच्या रस्त्यावर दोन गर्डरच्या मधील फट सांधण्याचे काम अद्याप सुरू आहे.या मार्गावरील कामांची स्थिती पाहता पुढील दीड महिना तरी हा मार्ग लोकांच्या वापरासाठी खुला होण्याची चिन्हे नाहीत. तरीही एमएमआरडीए हा मार्ग ‘लवकरच’ खुला करण्याच्या गोष्टी करत आहे. एमएमआरडीए करत असलेला दावा आणि वस्तुस्थिती यांमध्ये महद्अंतर असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात मेट्रोवन प्रकल्प लोकांसाठी खुला करण्याच्या घोषणेबरोबरच सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याबाबतची मुख्यमंत्र्यांची घोषणाही गाजराची पुंगीच ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा