सारंग हेलिकॉप्टर्सच्या पथकाने आकाशात थरारक कसरती तर हेलिकॉप्टर्समधून जमिनीवर उतरलेल्या गरुड पथकाच्या जाँबाज कमांडोंनी युद्धप्रसंग सादर करून ‘सारे जहाँ से अच्छा..’चा प्रत्यय नागपूरकरांना दिला.
भारतीय वायुसेनेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त वायुसेनेच्या शिवणगाव तळावर गुरुवारी थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडचे प्रमुख एअर मार्शल पी. कनकराज, उषा कनकराज, खासदार विजय दर्डा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, महापौर अनिल सोले, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्यासह भारतीय सैन्य दल व सुरक्षा दलांचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. निवडक शाळांच्या विद्यार्थ्यांसह नागरिक मोठय़ा संख्येने आले होते. याशिवाय सोनेगाव, शिवणगाव तसेच विमानतळ सभोवतालच्या इमारतींच्या गच्चीवर उभे राहून अनेकांनी ही प्रात्यक्षिके पाहिली.
भोसला मिलिटरी स्कूलच्या बँड पथकाच्या वादनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर वायुसेनेच्या बँड पथकाने सुमधूर गीतांचे वादन केले. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर वायुसेनेच्या अॅव्हरो विमानाने अगदी काही फुटांच्या उंचीवरून सलामी दिली. फली बक्षी यांनी एअरो मॉडेलिंगची प्रात्यक्षिके सादर केली. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील विविध विमानांची मॉडेल्स होती. रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित करण्यात आलेल्या विमानांच्या लहान प्रतिकृतींची गगन भरारी बच्चे कंपनीला भावली.
एअरो मॉडेलिंग संपत नाही तोच छाती दडपून टाकणाऱ्या आवाजाने उपस्थितांचे आकाशाकडे लक्ष गेले. एक ते दीड हजार फूट उंचीवर दोन अजस्र हेलिकॉप्टर्स येऊन थांबली. एमआय ७५ व्ही ६ बनावटीची ही हेलिकॉप्टर्स होती. त्यातून दोरखंडाच्या साह्य़ाने १५ सशस्त्र कमांडो खाली उतरले. गरुड पथकाचे हे कमांडो होते. थेट शत्रूच्या प्रदेशात उतरून गवताळ वा खडकाळ जमिनीची तमा न बाळगता प्रसंगी रांगत जाऊन लक्ष्यावर अचूक मारा करण्याचा युद्ध प्रसंग या जाँबाज कमांडोंनी सादर केला.
त्यानंतर आकाशात सहा सारंग हेलिकॉप्टर्सनी भरारी घेतली. एका रांगेत एकामागोमाग उड्डाण करीत या हेलिकॉप्टर्सनी कसरती सादर केल्या. वेगात येऊन एकमेकांना छेदून जाणे, डॉल्फिन माशाप्रमाणे अचानक गिरकी घेत वेगात निघून जाणे आदी २४ मिनिटांच्या कसरतींनी थरार निर्माण केला. याचवेळी ९ हजार फुट उंच आकाशात एएन ३२ प्रकारच्या विमानातून ‘आकाशगंगा’ पथकाचे पॅराट्रपर्स जमिनीच्या दिशेने झेपावले. विंग कमांडर स्वरुप व विंग कमांडर आशा ज्योतिर्मयी या दांपत्याचाही त्यात समावेश होता. सुमारे ४५ मिनिटांची विविध प्रात्यक्षिके पाहून उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे झाले. चेतक, ध्रुव, एमआय १७ हेलिकॉप्टर्स, सुपर हक्र्युलिक्स, एचआय ७१७ आदी विमाने तसेच बॉम्ब व दारुगोळ्यांचेही प्रदर्शन यावेळी ठेवण्यात आले होते.
नागपूरच्या आकाशात रंगला थरार
सारंग हेलिकॉप्टर्सच्या पथकाने आकाशात थरारक कसरती तर हेलिकॉप्टर्समधून जमिनीवर उतरलेल्या गरुड पथकाच्या जाँबाज कमांडोंनी युद्धप्रसंग सादर करून
First published on: 01-11-2013 at 08:15 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarang helicopters scode in nagpur