२६ मार्च २०१२ ची सकाळ. पंचवटीतील क्रांतीनगर या भागात राहणाऱ्या सारिका शेलार यांची नेहमीप्रमाणे सकाळच्या कामांची लगबग सुरू होती. मुलांची शाळा, त्यांचे डबे, पतीचा डबा, एक ना अनेक कामे. लहान संकेत हा बाथरूममध्ये होता तर मोठा सौरभ अजूनही अंथरुणातच. पती संभाजी हेही बैठकीत झोपलेले. अचानक मागील दाराला बांधलेला कुत्रा शक्ती मोठय़ांदा ओरडू लागला. शक्ती का ओरडतो म्हणून सारिका बघावयास लागल्या आणि समोरील दृश्य पाहून त्या गर्भगळितच झाल्या. दारात बिबटय़ा उभा होता.
बिबटय़ाने बैठकीत झोपलेल्या संभाजी यांच्यावर झेप घेतली. भांबावलेल्या सारिका यांनी स्वत:ला सावरत अशा कठीण परिस्थितीतही समयसूचकतेचे दर्शन घडवीत बेडरूममध्ये झोपलेल्या सौरभच्या खोलीला बाहेरून कडी घातली. तिकडे संभाजी आणि बिबटय़ा यांच्यात संघर्ष सुरू होता. संभाजी यांनी बिबटय़ाला जोरदार लाथ मारत मच्छरदाणीत अडकविले. बिबटय़ा अडकताच संभाजी वरील मजल्यावरील इतर मंडळींना सावध करण्यासाठी गेले. वरच्या मंडळींनी बाहेरच्या दिशेने पलायन केले. त्याच वेळी संभाजी यांचे वडील चंद्रकांत खाली आले. त्यांना बिबटय़ा कुठे आहे, हे माहीत नव्हते. मच्छरदाणीतील बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला चढविला. कशीबशी सुटका करीत चंद्रकांत यांनी छोटा संकेत, सौरभला घेऊन बाहेर पळ काढला. या संपूर्ण घडामोडीत सारिका या एकटय़ाच आतमध्ये राहिल्या. त्यांनी एकेक दरवाजे लावण्यास सुरुवात केली.
तोपर्यंत बिबटय़ा शेलार यांच्या बंगल्यात आल्याची वार्ता सर्वत्र पोहचल्याने बघ्यांची बाहेर एकच गर्दी झाली होती. एकीकडे गर्दीचा वाढता आवाज, दुसरीकडे समोर साक्षात बिबटय़ा, या परिस्थितीत सारिका यांनी स्वतला एका खोलीत डांबून घेतले. त्याच वेळी बिबटय़ाने मागील दाराने पलायन करू नये, म्हणून दरवाजाला बाहेरून कडी नसल्याने धरून ठेवण्यास त्यांनी गर्दीला सांगितले. एका खोलीत बंदिस्त सारिका आणि दुसरीकडे बिबटय़ाचा घरातील मुक्त वावर हा थरार साधारणत: अर्धा तास सुरू राहिला. नंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खिडकी तोडत सारिका यांची सुटका केली. सारिका यांनी दाखविलेल्या धैर्यामुळे घरातील नातेवाईकांसह परिसरातील अनेकांचे प्राण वाचले.
नवरात्रोत्सव म्हणजे देवींचे पूजन. नवरात्रोत्सव म्हणजे देवींच्या शक्तीला वंदन. कोणी त्यांना दुर्गा म्हणतात तर, कोणी रेणुका. कोणी जगदंबा तर कोणी अंबा. आधुनिक काळात विशेष, अजोड, कार्य करणाऱ्या महिलांमध्ये देवीचे रूप पाहिले जाते. संकटातून घराला तारणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीत हिंमत न हारणाऱ्या महिला म्हणजे जणूकाही दुर्गेचा अवतार. जीवनातील कठीण प्रसंगात त्या नेहमीच दुर्गावतार धारण करतात. वर्षभरातील अशा काही प्रसंगांविषयी आणि आधुनिक दुर्गाविषयी नवरात्रोत्सवानिमित्त माहिती देत आहोत. पहिल्या भागात पंचवटीतील सारिका शेलार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा