काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे हे शहरातील गुंडांना पोसण्याचे काम करतात. दलित महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना ते पाठीशी घालत असून सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होऊ नये म्हणून त्यांनी दलित कार्यकर्त्यांवर दबाव आणल्याचा आरोप आज या मोर्चातील आंदोलकांनी केला.
शहरातील एका दलित महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा मेन रोड, शिवाजी रोड मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. आंदोलनात काँग्रेसचे पुढारी अथवा कार्यकर्ते सहभागी नव्हते. या पाश्र्वभूमीवर अनेक आंदोलकांनी यावेळी काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध केला.
भाऊसाहेब पगारे म्हणाले, दलितांचा केवळ मतांसाठी वापर केला जातो. परंतु आता मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आमदार कांबळे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोर्चात सामील होऊ नये, म्हणून प्रयत्न केले. काँग्रेसचे नेते अद्याप पिडीत महिलेला वैयक्तिक भेटायला गेले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
बाबा शिंदे यांनी मतांसाठी मागे पुढे फिरणारे काँग्रेसचे नेते आता कुठे गेले असा सवाल केला. सुभाष त्रिभुवन म्हणाले, नगर जिल्ह्यात दलित अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही अत्याचार होतात. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा त्यांनी दिला. सुनीता गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या वतीने घटनेचा निषेध केला.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते म्हणाले, आम्ही महिला अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात भाग घेऊ नये यासाठी दमदाटी केली जाते. या घटनेचा कुठल्याही जाती धर्माशी संबंध नाही. सर्वानी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सुहास मापारी यांना देण्यात आले. यावेळी महेंद्र गायकवाड, महेंद्र साळवी, संजय रुपटे, सचिन ब्राम्हणे, भिमा बागुल, सागर भोसले, श्रीराम मोरे, बाळासाहेब हिवराळे, निलेश भालेराव, तिलक डुंगरवाल, देवीदास सोनावणे, आदी उपस्थित होते.
‘ससाणे-कांबळे गुंडांना पोसतात’
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे हे शहरातील गुंडांना पोसण्याचे काम करतात. दलित महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना ते पाठीशी घालत असून सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होऊ नये म्हणून त्यांनी दलित कार्यकर्त्यांवर दबाव आणल्याचा आरोप आज या मोर्चातील आंदोलकांनी केला
First published on: 11-03-2013 at 09:44 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sasane kamble shielding culprits in sexual abuse case