ससून रुग्णालयातील पॅथालॉजी प्रयोगशाळेतील संगणकाच्या यूपीएस व बॅटऱ्यांना बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून ‘ड्राय केमिकल पावडर’ चा वापर करून आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.  शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीन वाजून ५१ मिनिटाला ससून रुग्णालयातील पॅथालॉजी प्रयोगशाळेतील बॅटऱ्या आणि यूपीएसला आग लागल्याचा फोन आला. तत्काळ एक फायरगाडी ससून रुग्णालयात पाठविण्यात आली. या ठिकाणी पोहोचून या बॅटऱ्या आणि यूपीएसवर ड्राय केमिकल पावडर टाकून आग विझवण्यात आली. या बॅटऱ्यांशेजारी सहा ते सात संगणक होते. त्याचबरोबर या ठिकाणी औषधांचा साठा होता. वेळीच आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याची शक्यता आहे. या कारवाईमध्ये अग्निशामक दलाचे जवान सदाशिव वांजळे, सुनिल नरसिंगे, नितीन टेमगिरे आणि चालक श्री सुंदर यांनी घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली.