गेले दोन-तीन वर्षे पाऊस नसल्याने, शिवाय लगतच्या शेती महामंडळाच्या जमिनी पडीक असल्याने जमिनीत पाणी नाही. त्यात नीरा उजवा कालव्याच्या दुसऱ्या आवर्तनाचे नियोजन फिसकटले. त्यामुळे हातातोंडाला आलेली उसाची पिके हातची जाण्याची परिस्थिती उद्भवली असताना माळीनगरच्या दि सासवड माळी शुगर फॅक्टरी या साखर कारखान्याने ठिबक सिंचनाची सोय असणाऱ्या ऊस क्षेत्रास टँकरने पाणी देऊन व उसावर बाष्पीभवन रोधक फवारण्या करून शेकडो एकर ऊस पीक जतन करण्यात यश मिळवले असून त्यांच्या या सकारात्मक प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि सासवड माळी साखर कारखाना हा स्वत:चा पुरेसा ऊस उपलब्ध नसतानाही व्यवस्थित चालविण्याची कसरत करीत आहे. यावर्षी या कारखान्याच्या सभासदांना नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागले. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपुऱ्या पावसामुळे जमिनीत पाणी राहिले नाही. त्यात लगत असणाऱ्या शेती महामंडळाच्या जमिनीसाठी निरा उजवा कालव्याचे पाणी मिळत असे. परंतु गेली सात-आठ वर्षांपासून याही जमिनी पडीक असल्याने पाझर थांबला आहे. या कारखान्यांची पाणीवाटप संस्था असून त्यांना निरा उजव्या कालव्याचे हक्काचे पाणी मिळते. परंतु या वर्षी त्या पाण्याच्याही दुसऱ्या आवर्तनाचे नियोजन फिसकटले व अनेक सभासद पाण्यापासून वंचित राहिले. त्यांची ऊसपिके जळू लागली. त्यावरून बरेच वादंग होऊन अखेर पाणीवाटप संस्थेचे अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला. मात्र हा त्यावरचा उपाय नव्हता.
कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे व त्यांचे सहकाऱ्यांनी त्यावर तोडगा काढून ज्या उसाच्या क्षेत्रास ठिबक सिंचनाची सोय आहे अशा क्षेत्रास टँकरने पाणी देण्याचे नियोजन केले. त्यानुसार १५ हजार लिटर्स पाण्याच्या टँकरमधील पाणी पुढे पाण्याचा दाब वाढण्यासाठी इंजिनने उचलून त्या इंजिनचा पाईप ठिबक सिंचनाच्या पाईपला जोडल्यामुळे या पाण्याला दाब मिळून ठिबकद्वारे सर्वत्र सिंचन होऊ लागले. साधारणपणे २५ मिनिटात एका टँकरमधील पाण्याचे सिंचन होते व एक एकरासाठी साधारण दोन टंॅकर्स एवढे पाणी दिले जाते. त्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून दररोज ९ टँकर्स पाणी वाटपाचे काम होत आहे. यातून शेकडो एकर ऊस जतन झाला आहे. तसेच आहे ते थोडेसे पाणीही बाष्पीभवन होऊ नये म्हणून २०० लिटर्स पाण्यात ४ किलो ००.५० व ४ किलो युरिया याच्या मिश्रणाची फवारणी करण्याचेही काम सुरू आहे. त्यासाठी एस.टी.पी. असणाऱ्या चार मोटारसायकली दिवसभर पळत आहेत. एक एकर क्षेत्रासाठी अशा मिश्रणाचे २०० लिटर्स पाणी फवारले जात आहे व सुरुवातीस हास्यास्पद वाटणारा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य शेतकी अधिकारी सुरेंद्र बधे, ऊस विकास अधिकारी अनुप इनामके, इरिगेशन ऑफीसर रत्नाकर झगडे हे या माध्यमातून ऊस जतन करण्यासाठी झटत आहेत.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा