ठाण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला सॅटिस प्रकल्प फेरीवाले आणि बेकायदा टपरीधारकांसाठी कमालीचा उपयुक्त ठरू लागला असून महापालिकेचे विद्यमान आयुक्त असीम गुप्ता यांच्या बोटचेपे धोरणामुळे संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा पुन्हा एकदा उच्छाद सुरू झाला आहे. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या बदलीनंतर ठाणे शहरातील पदपथांवर पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरू झाले आहे. विद्यमान आयुक्त गुप्ता यांचे मात्र या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकाऱ्यांचेही फावले आहे. रेल्वे स्थानक परिसरात दररोज नव्या फेरीवाल्यांची भर पडू लागली असून पूर्वीप्रमाणे सॅटिसच्या सावलीखाली फेरीवाल्यांचा बाजार सुरू झाला आहे.
ठाणे शहरात पदपथ फेरीवाला मुक्त करण्यासाठी तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी कठोर भूमिका घेतली होती. ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे सहा लाख प्रवाशांची ये-जा असते. ठाणे शहरातील दोन्ही बाजूंकडून या ठिकाणी लाखोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात. या प्रवाशांना सोयीचे ठरावे याकरिता रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त व्हावा, असे राजीव यांचे धोरण होते. अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना तंबी देत त्यांच्याकडून राजीव यांनी हे पदपथ मोकळे करुन घेतले. शहरातील इतर भागांत पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर त्यामुळे धाक निर्माण झाला. गोखले मार्ग, चरई, पाचपाखाडी, तलावपाळी अशा शहरातील प्रमुख भागांमधील पदपथ, रस्ते राजीव यांच्या काळात फेरीवालामुक्त बनले. राजीव यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले असीम गुप्ता स्थिरस्थावर होईपर्यत ही परिस्थिती कायम होती. त्यामुळे गुप्ता यांची धोरणेही कडक असतील, अशी आशा ठाणेकर बाळगून होते. मात्र, गुप्ता यांचा कार्यकाळ जसा पुढे सरकतो आहे तशी येथील फेरीवाल्यांची भीड पुन्हा एकदा चेपली असून रेल्वे स्थानकालगत असलेल्या सॅटिसच्या आश्रयाला शेकडो फेरीवाल्यांचे जथ्थे दिसू लागल्यामुळे ठाणेकरांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. सॅटिस परिसरात जागोजागी फेरीवाले आपले बस्तान बसवू लागले असून गोखले मार्गावरील पदपथ अडविण्याचे उद्योगही पुर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत. गुप्ता यांचा वचक नसल्यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाच्या डोळ्यादेखत फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली असून सॅटिसवरील भागातही कधी नव्हे ते फेरीवाले दिसू लागल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाचा पूर्वेकडील परिसर तसेच तलावपाळी भागातही फेरीवाल्यांचा वावर दिसू लागला आहे. लोकमान्यनगर, काजुवाडी, पवारनगर अशा भागांत तर जागोजागी फेरीवाले दिसू लागले असून ठाणे, कळवा, मुंब्रा ही शहरे पुन्हा एकदा फेरीवाल्यांना आंदण दिल्याचे चित्र दिसू लागले आहे. यासंबंधी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. गुप्ता यांनीही मोबाइल उचलला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा