महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रशंसनीय कामगिरी केली असून, अनेक विद्यालयांनी शहरी भागापेक्षा चांगल्या निकालाची नोंद केली आहे. मनमाडमधील विद्यालयांचा निकालही समाधानकारक लागला. शहरात छत्रे विद्यालयाचा निकाल सर्वाधिक (९८.८२ टक्के) लागला.
छत्रे विद्यालयात मयूर मेंगाणे (४१२), हेमंत भालेराव (४०६), शुभम तुरकणे (३९४) हे गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मध्य रेल्वे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६.५५ टक्के लागला. या शाळेतून परीक्षेला बसलेल्या ८७ पैकी ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात शेख राहीन अजहर (४८९), आकाश वरखेडे (४५२), गोकुळ बढे (४१६) हे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांकात आले.
येवला तालुक्यात प्रीतेश नागपुरे प्रथम
येवला तालुक्यात एन्झोकेम हायस्कूल व श्रीमान गंगाराम छबिलदासशेठ उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाणिज्य व विज्ञान शाखेत पहिले पाच विद्यार्थी आले आहेत.
गंगाराम छबिलदासशेठ उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के लागला. प्रीतेश सुभाष नागपुरे हा ८७.१६ टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात प्रथम आला, तर अविनाश आढाव ७८.५० टक्के गुण मिळवून दुसरा आला. एन्झोकेम विद्यालयातील वाणिज्य शाखेचे पाच विद्यार्थी तालुक्यात पहिल्या पाचमध्ये आहेत.
येवला तालुक्याच्या इतिहासात वाणिज्य शाखेत नम्रता सोनवणे विक्रमी ८७.६६ टक्के गुण मिळवून प्रथम आली. श्रद्धा कुमावत ८४.५० टक्क्यांसह द्वितीय, धनश्री हंडी ८२.६६ टक्क्यांसह तृतीय आली. कला शाखेचा निकाल ७५ टक्के लागला असून गायत्री जाधव ७५.६६ टक्के गुण मिळवून प्रथम, तर अनिता खैरनार ७४.५० टक्के गुणांसह द्वितीय आली.