शेतकऱ्यांनी केलेली पहिली आणि दुसरी पेरणी वाया गेली असून आता तिसरी पेरणी आर्थिक परिस्थिीमुळे शेतकरी करू शकत नाही. विदर्भात शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असताना राज्य व केंद्र सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारकडून  मदत, मोफत बियाणे आणि खावटी मिळावी, या मागण्यांसाठी १२ जुलैला विदर्भातील शेतकरी व शेतकरी विधवा यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडामध्ये उपोषण सत्याग्रह करणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करीत असते. मात्र, ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे नैराश्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असतो. यावेळी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहेत. मात्र, त्याकडे सरकारचे लक्ष नाही. राज्य सरकार सध्या विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहे, तर दुसरीकडे ‘अच्छे दिन आये’ अशी घोषणा करीत सत्तेवर आलेले केंद्र सरकार फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. जून महिन्यात ७, ११ १७ व २४ तारखेला पावसाने हजेरी लावल्यावर शेतकऱ्यांनी कापसाची आणि सोयाबीनची सुमारे २० लाख हेक्टर क्षेत्रावर केलेली पेरणी पूर्णपणे नष्ट झाली असून दुबार व तिबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ावर दुष्काळाचे सावट निर्माण झाली आहे.
या संदर्भात विदर्भ जन आंदोलन समितीचे प्रमुख आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी सांगितले, शेतकऱ्यांसमोर उपोषणाशिवाय पर्याय नाही. दुष्काळाचा प्रचंड फटका हा यवतमाळ जिल्ह्य़ाला बसला आहे. त्यामुळे शेतकरी या जिल्ह्य़ामध्ये उपोषण करणार आहेत. या उपोषणात शेतकऱ्यांना सरकारी मदत, बियाणे, कर्जमाफी व संपूर्ण वीज माफीसह सर्व आदिवासींना नवीन खावटी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या विधवा या उपोषणात सहभागी होणार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी बियाणे विकत घेण्यासाठी घरचे सोने गहाण ठेवून बँकेतून पीक कर्ज घेतले आहे आणि ते सुद्धा वाया गेले आहे. शेजारच्या तेलंगणा सरकारने तात्काळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत केली आहे. शिवाय सोने गहाण ठेवून घेतलेले कर्ज माफ केले आहे, पण राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि नेते सध्या विधानसभा निवडणुकीच्या कामात आहेत. राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात येणार आहे.
राज्यात पिण्याचे पाण्याचे संकट असून आणीबाणीचे स्वरूप समोर येत असताना आघाडी सरकार व मुख्यमंत्री खुर्ची व निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त आहेत. तर शेतकरी चिंतेने आत्महत्या करीत आहेत. नेत्यांनी सरकार व प्रशासनाची पत कायम ठेवण्यासाठी संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, असेही तिवारी म्हणाले. पाऊस लांबल्याने या वर्षीचा खरीप हंगाम बुडणार हे निश्चत झाले आहे. एकीकडे बियाण्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे बाजारात बोगस बियाणे आले आहे, बियाण्यांचे भाव चढत आहे. या चक्रव्यूहात बळीराजा भरडला जात असताना सरकार मात्र झोपले आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.

Story img Loader