‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वाच्या वेळी त्यांची ओळख गया येथील ‘माऊंटन मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांझींच्या अचाट पराक्रमाशी झाली होती. त्यानंतर या पर्वाची घोषणा आमिरने खुद्द मांझींच्या गावात गेहलूरमध्ये त्यांनी बनवलेल्या रस्त्यावरून फेरी मारली. आमिरने तेव्हा मांझी परिवाराची भेटही घेतली. पण, आमिरसाठी तिथे जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांच्या परिवाराशी हवा तसा संवाद आमिरला साधता आला नाही. म्हणून, पुन्हा एकदा आमिरने आपल्या टीमला मांझी परिवाराची भेट घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पहिल्या पर्वात गेहलूरमधील दशरथ मांझी नावाच्या अचाट माणसाची कथा आमिरच्या ऐकिवात आली होती. हातात छिन्नी आणि हातोडा घेऊन २२ वर्ष या माणसाने एकटय़ाने दोन डोंगर फोडून मध्ये रस्ता तयार केला. आणि त्यांना ‘माऊंटन मॅन’ ही ओळख मिळाली. मात्र, मांझींच्या या अतुलनीय योगदानानंतरही त्यांचा परिवार अजून आहे त्याच परिस्थितीत आहे. त्यांची भेट घेऊन त्यांच्यासाठी काय करत येईल, याची चाचपणी करायची आणि ज्या वळणावर ‘सत्यमेव जयते’चे पहिले पर्व संपले तिथूनच दुसऱ्या पर्वाची सुरुवात करायची हा आमचा विचार होता. आणि त्यासाठी आम्ही मांझींनी तयार केलेल्या त्या रस्त्यावरच दुसऱ्या पर्वाची घोषणा करायची, असा निर्णय घेतल्याचे आमिरने सांगितले. मात्र, आमिरला पाहण्यासाठी त्या छोटय़ाशा गावात एवढी गर्दी झाली की त्याला मांझी परिवाराशी थेट संवादही साधता आला नाही.
गेहलूरचा अनुभव सांगताना आमिरने सांगितले की, त्या छोटय़ाशा गावात दोन डोंगरांच्या मध्ये असणारा तो रस्ता सगळा लोकांनी फु लून गेला होता. आम्ही त्या गर्दीला दूर ठेवत कसेबसे चित्रिकरण केले. जवळजवळ ३५ हजार लोक त्या दोन डोंगरांच्या मधून सगळीकडे पसरले होते. त्यांच्यातून वाट काढत मांझी परिवाराला मी भेटलो खरा.. पण, अजूनही त्यांच्यासमोर नेमक्या काय अडचणी आहेत आणि आमच्याकडून त्यांना काय अपेक्षित आहे हे मला कळलेले नाही. म्हणूनच मी पुन्हा एकदा ‘सत्यमेव जयते’च्या आमच्या टीमला मांझी परिवाराची भेट घेण्यास सांगितले आहे, असे तो म्हणाला. मांझी परिवारानेही दशरथ मांझींच्या कार्याची दखल कार्यक्रमातून घेतली गेली असली तरी आम्हाला आमिरला भेटून बोलायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आमिरने त्यांच्या भेटीची इच्छा पूर्ण केली असली तरी त्यांच्यासाठी काहीतरी ठोस मदत करायला हवी, या हेतूने ‘सत्यमेव जयते’ची टीम पुन्हा गेहलूरला भेट देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा