‘सही जनगणना सही विकास’ हे भारत सरकारचे ब्रीद असतांना ओबीसींची स्वतंत्र व्होट बँक होऊ नये, त्याची सत्तेतील भागिदारी वाढू नये, यासाठीच ओबीसींच्या जनगणनेला प्रस्थापित व्यवस्थेचे लोक विरोध करीत असल्याचे रोखठोक प्रतिपादन सत्यशोधक विचारवंत अरिवद माळी यांनी केले.
येथे आयोजित स्मृतिपर्वात ते बोलत होते. ओबीसींना जनगणनेचे सत्य कळू नये म्हणून त्यांनी ओबीसींची अवस्था कचऱ्यासारखी केली. मंडल आयोगात २७ टक्के आरक्षण देऊन खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न केला, क्रिमीलिअरची भानगड लावली. एकंदरीत वडाचे झाड कुंडीत लावल्यासारखी ओबीसींची अवस्था केली. जातनिहाय जनगणना केली तर शिक्षण, शासन, प्रशासन यात ओबीसींची भागिदारी वाढून आपले सामाजिक, आíथक, धार्मिक वर्चस्व नष्ट होईल, या भीतीपोटी ब्राम्हणी धर्मव्यवस्था ओबीसी जनगणनेला कायम विरोध करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अमर तांडेकर, डॉ. चंद्रशेखर चांदेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र गद्रे, आर.एस. िपजरकर यांची उपस्थिती होती. ओबीसी सेवा संघ व चर्मकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुले आंबेडकर स्मृतिपर्वाचे संयोजक ज्ञानेश्वर गोबरे, विलास काळे, प्रा. सलीम चव्हाण, प्रवक्ते रियाज सिद्दिकी यांच्यासमवेत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आर. एम. इंगळे, डॉ.किरण खंदारे, हरीष पाचकोर, खुशाल डवरे, देवानंद तांडेकर, नरेश बच्छराज, नरेश खरतडे, डॉ. निखिल भागवते, डॉ. बागडे, रामदास चंदनकर, मीनाक्षी पानझाडे, संध्या बागडे यांची उपस्थिती होती. प्रारंभी माया गोबरे यांनी म. फुले सत्यशोधक प्रतिज्ञेचे वाचन केले.
नरेंद्र गद्रे यांनी अध्यक्षीय भाषणात ओबीसींना नेता न मिळाल्यामुळे हा समाज मागासला असल्याचे मत व्यक्त केले. तो धागा पकडून अरिवद माळी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना ओबीसींना ५२ टक्के आरक्षण दिले. संविधान लागू झाल्यापासून एक वर्षांच्या आत बाबासाहेबांनी राष्ट्रपतींना लागू करण्यासाठी निवेदन दिले. ३४० कलम हे ओबीसींसाठी अस्सल बिल होते. त्या बिलाला काका कालेलकर आयोगापासून टोचण्या मारण्याचे काम सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसीचे उध्दारक नेते असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
आदेश िपजरकर यांनी दु:खमुक्त गाव निर्माण करण्यासाठी संत रवीदासाची  विचारधारा असून महापुरुषाचे  विचार आत्मसात केल्यानेच समग्र कल्याण होत असल्याचे म्हटले. अमर तोडकर म्हणाले, डॉ.आंबेडकर ओबीसींसाठी लढले, त्याच्यापेक्षा दुसरा मोठा नेता नाही. ज्या समाजाचा नेता लायक असतो तोच समाज नायक असतो. संत रविदास हे तथागतांच्या  विचारांचे पाईक होते. म्हणून ‘ द अन्टचेबल ’ हा ग्रंथ बाबासाहेबांनी संत रविदासांनी समर्पित केला. सोबतच सध्यस्थितीत प्रतिस्पर्धी ताकदीने संघटित होत असून त्यांना रोखण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे पाईक बना,  असा संदेश दिला. प्रास्ताविक ज्ञानेश्वर गोबरे, एल.आर. वानखडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अरुण सांगळे यांनी करून दिला, संचालन सतीश इसाळकर यांनी तर आभार राजेश मुके यांनी मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyasodhaka thinker arivada mali
Show comments