संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईच्या इंदू मिलच्या जागेच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आज आंबेडकरी जनतेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत बाबासाहेबांना अभिवादन केले.
आज सर्वत्र कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. विविध विहारांमध्ये, संविधान चौक, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांच्या कार्यालये आणि चौक किंवा विहारातील बाबासाहेबांच्या मूर्तीला हार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. आंबेडकर कॉलेज, डॉ. आंबेडकर पतव्युत्तर विचारधारा विभागात व्याख्याने आयोजित करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांवर भाषणे झाली. संघटनांनी कँडलमार्च, मिरवणुका काढून अभिवादन केले. दिघोरी परिसरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नीलकमलनगर ते योगेश्वर नगरात पंचशील झेंडा फडकवत ५६व्या महापरिनिर्वाण कँडलमार्च काढला. भारतीय बौद्ध परिषदेतर्फे विविध कार्यक्रम शांतिवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. समाज समता शिक्षक संघातर्फे शालेय विद्यार्थ्यांचा अभिवादन सायकल मार्च सेंट्रल एव्हेन्यू, बाबुळवन, माटे चौक आणि इंदोरा बुद्ध विहारात काढण्यात आला. महात्मा फुले बहुजन विकास संस्थेच्यावतीने चंद्रनगर कार्यालयात सभा घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
ठिकठिकाणी करण्यात आलेल्या विनम्र अभिवादनाप्रसंगी मुंबईच्या इंदू मिलच्या जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाला हस्तांतरित करण्याबद्दलच्या केंद्रीय निर्णयाचे स्वागत आणि चर्चा ऐकायला मिळाल्या. उत्कर्ष वाचनालय, मोठा इंदोरा भागात बुद्धविहार समिती, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटना, कास्ट्राईब महापालिका शिक्षक व कर्मचारी संघटना, मिलिंद विद्यालय, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, नागपूर शहर काँग्रेस समिती, आंबेडकरी विचार मोर्चा, पंचशील नाईट स्कूल, सुगत जेसीस आणि इतर असंख्य संघटनांच्यावतीने संविधान चौकात आणि संस्थांमध्ये बाबासाहेबांना हार घालून अभिवादन करण्यात वाहण्यात आले.
सम्यक थिएटरच्यावतीने दीक्षाभूमीवर ‘६/१२ एक मुकी वेदना’ हा संगीतमय आदरांजलीचा कार्यक्रम करण्यात आला. यापूर्वी सम्यक थिएटरच्यावतीने महासूर्य’ या महानाटय़ाचा प्रयोग करण्यात आला होता. सहा डिसेंबर ही आंबेडकरी जनतेची एक मुकी वेदना आहे, या भावनेतून हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमात टाळ्या आणि शिटय़ांना वाव नसेल, असे या कार्यक्रमाचे संयोजक नरेश साखरे यांची
आहे.
अभिवाचन डॉ. सुनील रामटेके, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, कमल वाघधरे, प्रसिद्ध गझलकार किरण मेश्राम यांची आहे. गीत व संकल्पना डॉ. सुनील रामटेके यांचे आहे. गायक अनिल खोब्रागडे, गायिका छाया वानखेडे, आकांक्षा नगरकर,  प्रमोद खंडाळे यांनी गीते गायिली आहेत. भुपेश सवाई यांचे संगीत तर, मंगेश विजयकर यांची प्रकाश योजना आहे. अमित शेंडे, नवीन मेंढे यांचे नेपथ्य या कार्यक्रमाला लाभले  होते.     

Story img Loader