चॉकलेट हिरो ही संकल्पना मराठीत फारशी रुजलीच नाही. महाराष्ट्राच्या रांगडय़ा संस्कृतीप्रमाणे मराठीतील नायकही, काही अपवाद वगळता, चॉकलेट हिरो या संकल्पनेत अजिबात न बसणारे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही परिस्थिती बदलत असून छोटय़ा पडद्याच्या प्रभावी प्रचारामुळे आता गोंडस चेहऱ्यांचे अनेक नायक मराठी चित्रपटसृष्टीत दिसू लागले आहेत. ‘राधा ही बावरी’ या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेला एक गोंडस चेहरा म्हणजे सौरभ गोखले. हा सौरभ मोठय़ा पडद्यावर मात्र एकदम डॅशिंग लूकमध्ये दिसणार आहे. ‘योद्धा’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून या चित्रपटात तो निधडय़ा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार  आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ या ऐतिहासिक मालिकेतील व्यंकटराव घोरपडे या भूमिकेतील सौरभला लगेचच ‘मांडला दोन घडीचा डाव’ या मालिकेतील प्रमुख भूमिका मिळाली. मात्र त्याला खरी ओळख दिली ती ‘राधा ही बावरी’मधील सौरभच्या भूमिकेने. या मालिकेआधी ‘उंच माझा झोका’मध्ये सौरभने क्रांतिकारकाचे काम केले होते. हे काम निर्माता मच्छिंद्र धुमाळ आणि विजय चौधरी यांनी पाहिले आणि आपल्याला ‘योद्धा’साठी विचारणा केली, असे सौरभने सांगितले. ‘राधा ही बावरी’मध्ये अत्यंत बालिशपणे वागणारा सौरभ मोठय़ा पडद्यावर पदार्पण करताना मात्र धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एका गावातील प्रामाणिक सरपंचाचा मुलगा असलेल्या या अधिकाऱ्याची बदली त्यांच्याच गावात होते. मग चांगल्या आणि वाईटामध्ये संघर्ष सुरू होतो, अशी ‘योद्धा’ या चित्रपटाची साधारण कथा आहे. या चित्रपटात सौरभबरोबर शर्मिष्ठा राऊतही काम करत असून तिचाही हा पहिलाच चित्रपट आहे.
‘टफ लूक’साठी गाळला घाम
या टफ लूकसाठी मी खूप मेहेनत घेतली. माझा मित्र निखिल सोहनी याने माझ्यासाठी व्यायामाचे वेळापत्रक बनवले होते. मी तब्बल दीड महिना एक दिवसाआड पर्वती चढून जात होतो. तेही दोन्ही हातांत भक्कम वजनाचे डम्बेल्स घेऊन ‘वॉकिंग लंजेस’ मारत. वॉकिंग लंजेस म्हणजे हातात डम्बेल्स घेऊन एक पाऊल पुढे टाकून गुढग्यात सरळ वाकवायचा आणि मग पाय पुढे टाकायचा. त्यामुळे चरबी लवकर कमी होते. आजही मी माझ्या फिटनेसवर असाच भर देतो व रोज किमान दीड तास तरी व्यायाम करतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा