एखाद्या वाचनीय पुस्तकाविषयी इतरांना सांगावे, त्या पुस्तकातील मर्मस्थानांविषयी चर्चा करावी असे बहुतेक वाचकांना वाटत असते. परंतु एकतर तशी संधी मिळत नाही किंवा समोरील व्यक्तीला पुस्तकांविषयी फारशी आवडच नसते. हे ध्यानात घेऊन आणि पुस्तकांविषयी वाचकांच्या मनात असलेल्या विचारांची देवघेव व्हावी या उद्देशाने येथील सार्वजनिक वाचनालयाशी संबंधित काही साहित्यवेडय़ा मंडळींनी ‘सावाना वाचक मंडळ’ स्थापन केले आहे. या मंडळाचे उद्घाटन शनिवारी गंगापूर रस्त्यावरील सावना गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालयात ज्येष्ठ कवी नरेश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
चोखंदळ वाचकांची आवडही तितकीच चोखंदळ असते. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे साहित्य धुंडाळण्याची त्यांची सवय जेव्हां ते इतरांशी साहित्यविषयक चर्चा करतात, तेव्हां कामी येते. ऐतिहासीक, वैज्ञानिक, क्रीडा, पर्यटन, मनोरंजनात्मक, पाककला अशा कितीतरी विषयांवरील साहित्य रसिकांच्या वाचनात येते. यापैकी सर्वच साहित्य आवडणारे असते असे नाही. त्यापैकी एखादे  पुस्तक मात्र वाचकाच्या हृदयात ठाण मांडून बसते. त्या पुस्तकातील वाक्ये असोत किंवा आशय, विषय, मांडणी हे सर्वकाही वाचकाला खिळवून ठेवण्यास कारणीभूत ठरतात. या पुस्तकाविषयी इतरांना माहिती द्यावी, त्याविषयी सांगावे असे वाचकांना वाटत असते. परंतु एकाचवेळी अनेकांशी असा संवाद साधण्याची संधी मिळणे जरा अवघडच. साहित्यप्रेमी वाचकांची ही अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक वाचनालयाशी संबंधित देवदत्त जोशी सुनीता गायधनी, श्रीकांत अरगडे या मंडळींनी सावाना वाचक मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे मंडळ सर्व वाचकांशी खुले असून शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्याचे उद्घाटन होणार आहे. डॉ. चंद्रकांत संकलेचा हे प्रमुख पाहुणे व वक्ते आहेत. डॉ. संकलेचा हे त्यांना आवडलेल्या पुस्तकाविषयी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. या मंडळातंर्गत कोणताही वाचक आपणांस आवडलेल्या पुस्तकावर वक्ता म्हणून विचार मांडू शकतो. त्यासाठी उद्यान वाचनालयात ठेवलेल्या नोंदवहीत आपले नाव, फोन व मोबाईल नंबर, पुस्तकाचे नाव यांची नोंद करावी लागेल. पुस्तकाविषयी बोलताना  प्रत्येक वक्त्याने वेळेचे भान राखावे, यासाठी या कार्यक्रमात एक तासाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मंडळातंर्गत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी देवदत्त जोशी ९८२२२१७९३५, सुनीता गायधनी ९४२२२८७९५२, श्रीकांत अरगडे ९०११००१९८३ यांच्याशी संपर्क साधावा.   

Story img Loader