स्वातंत्र्यप्रेमी सावरकरांची सर्वार्थाने जगाला ओळख होणे गरजेचे आहे. त्यांचे सर्व पैलू जगाला कळले तरच सावरकर आपल्याला कळले असे आपण म्हणू शकतो. मात्र क्रांतिकारकांविषयी खरी माहिती काही नतद्रष्ट व परदेशी हस्तक दाबून ठेवतात. सावरकरांच्या क्रांतिकारक गुणांशिवाय इतर गुणविशेष समाजासमोर आणण्यात त्यांच्यामार्फत बाधा आणली जाते. मात्र खऱ्या सावरकर विचारांनीच देशात परिवर्तन येईल, असे प्रतिपादन सावरकर विचारांचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी केले.
येथील गोदाघाटावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत २८ वे पुष्प घळसासी यांनी ‘समाज सुधारक सावरकर’ या विषयावर गुंफले. वि. म. गोगटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. घळसासी म्हणाले, नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याआधी केवळ अटलबिहारी वाजपेयी यांनी सावरकरांची पूजा केली होती. इतर कोणालाही सावरकरांची दखल घ्यावी असे वाटले नाही. सावरकरांची पूजा करण्यासाठी धारिष्टय़ लागते, असे त्यांनी सांगितले.
सावरकर अनुयायांनी सावरकरांचे धगधगते व्यक्तिमत्त्व लोकांसमोर मांडले. कोणते सावरकर जगासमोर ठेवायचे हा खरा प्रश्न आहे. खरे तर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यी व्यक्तिमत्त्व. ते सशस्त्र क्रांतीचे जनक होते, ते नाटककार होते, ते इतिहास लिहिणारे इतिहासकार होते, भाषाशुद्धी आग्रह धरणारे, राजकीय विचारवंत होते. सशस्त्र क्रांती हा सावरकरांच्या अनेक पैलूंपैकी एक. सावरकरांनी काही अटी मान्य करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. त्यात रत्नागिरी सोडणार नाही व राजकारण सहभागी होणार नाही या दोन मुख्य अटी होत्या. हे सांगायला सावरकर भक्तांना संकोच का वाटतो, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. रत्नागिरीमध्ये सावरकरांनी अविस्मरणीय काम केले. आपल्या सर्वाना सावरकरांचे विचार पुढे न्यायचे असतील, तर एकीकडे कर्मकांड करायचे व दुसरीकडे सावकरांचा विचार पोहचवायचा असे चालणार नाही. आपल्याला एकनिष्ठ व्हावे लागेल असेही घळसासी म्हणाले.जात ही जन्माधिष्ठित असूच शकत नाही. जातिभेद संपल्यावर समाज एकत्र येईल. मंत्रबळ नव्हे तर तंत्रबळ व विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सामथ्र्यशाली देशाची निर्मिती होऊ शकेल हा सावरकरांचा विचार रुजला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
व्याख्यानमालेचा शनिवारी समारोप
वसंत व्याख्यानमालेचा समारोप ३१ मे रोजी सायंकाळी सात वाजता य. म. पटांगणावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे ऋषी नित्यप्रज्ञा यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी भक्तिगीतांचा सत्संग होणार असून, महापौर अॅड. यतीन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेता शशिकांत जाधव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट स्त्री-पुरुष श्रोता, उत्कृष्ट कार्यकर्ता सत्कार करण्यात येणार आहे. समारोपास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले आहे.