सुशिक्षित समाजातील स्त्रीभ्रुणहत्येच्या गंभीर समस्येवर व्यंगचित्रांद्वारे बोट ठेवत ‘मुलगी भार नाही, आधार आहे.., आपली मुलगीही इतिहास घडवू शकते.., लेक वाचवा भविष्य घडवा.. असे अनेक संदेश पुस्तिकेच्या माध्यमातून देत जनजागृती करण्याचा प्रयत्न येथील भिकन कृपाराम जगताप बहुउद्देशीय संस्थेने सुरू केला आहे. नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून राबविलेल्या या अभियानांतर्गत तब्बल दहा हजार पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे.
स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी ‘लेक वाचवा.. भविष्य घडवा’ जनजागृती अभियान संस्थेने हाती घेतले आहे. त्या अंतर्गत सोळा पानी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मुलींचा घटणारा जन्मदर हा गेल्या काही वर्षांतील गंभीर प्रश्न. मुलगाच हवा या अट्टाहासामुळे मुलीला दुय्यम वागणूक दिली जाते. महिलांमध्ये असणारी आर्थिक, सामाजिक व शारीरिक असुरक्षितता, हुंडा पद्धती, गर्भलिंग निदानाची सहज उपलब्धता, वैद्यकीय क्षेत्रातील ढासळती नैतिकता ही खरेतर स्त्री भ्रुणहत्येची कारणे. स्त्रीभ्रुण हत्या एक भयावह समस्या कशी बनली आहे, याची काव्यात्मक पद्धतीने जाणीव करून देण्यात आली. त्यात दवाखान्यात एका गर्भातील बालिकेने आपल्या आईशी साधलेला संवाद अधोरेखीत करण्यात आला. या व्यतिरिक्त ‘एका कळीची दैनंदिनी’ कशी असते, याची अतिशय हृदययद्रावक पद्धतीने मांडणी करण्यात आली. स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी गाव पातळीवर विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करावा, केवळ मुली असणाऱ्या जोडप्यांचा सत्कार, मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन, समाजाची मुलीबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न, स्त्री-पुरूष समानतेचे धडे देणे आवश्यक असल्याची बाब मांडण्यात आली आहे.
पुस्तिकेचा महत्वपूर्ण भाग आहे तो व्यंगचित्रांचा. मुलींचे प्रमाण कमी झाल्यास पुरूषांवर काय वेळ येऊ शकते याची काही उदाहरणे व्यंगचित्रांमधून रेखाटण्यात आली आहे. स्त्रीभ्रुण हत्या करण्यात सुशिक्षित समाज आघाडीवर आहे. तुलनेत आदिवासी भागात हे प्रमाण अतिशय नगण्य असते. सुशिक्षित वर्गाची ही कार्यशैली उघड करण्यात आली. संपत्तीत मुलाला व मुलीला समान हक्क द्या, हुंडाबळी टाळण्यास पालकांची भूमिका महत्वाची असते, हुंडय़ामुळे सुरक्षितता, प्रतिष्ठा किंवा कोणत्याही प्रकारचा आत्मसन्मान लाभत नाही, कौटुंबिक हिंसाचार सहन करू नका, त्यातून मरण ओढवू शकते आदी मुद्यांचा विचार करण्याचा सल्लाही देण्यात
आला आहे. नवरात्रोत्सवात शाळा, महाविद्यालये, बचतगट आदी ठिकाणी या पुस्तिकांचे मोफत स्वरूपात वाटप केले जात आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदलाल जगताप, नामदेव सदावर्ते, नामदेव बिरारी, प्रेमचंद जगताप आदी प्रयत्नशील आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा