स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पदार्थ, मालाची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून त्याबरोबर बांधणी व विक्री कौशल्यातून आपल्या वस्तूंचे वेगळेपण सिद्ध करावे, असा बोध यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे येथे आयोजित ‘संकल्प उद्योजकता’ कार्यशाळेद्वारे मिळाला. जिल्ह्य़ातील बचत गटातील महिलांसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रात आयोजित कार्यशाळेत सुहास घोलप व धनलक्ष्मी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी उद्योजक होण्यासाठीच्या मूलभूत बाबी, ग्राहकांची मानसिकता व काळानुसार उत्पादनात बदल करणे, जाहिरातींचे तंत्र याविषयी विविध उदाहरणे देऊन त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध खेळ व चित्रफितीच्या माध्यमातून संघ भावना, समोरच्याचे ऐकून घेण्याची वृत्ती, सुसंवाद याविषयी सांगण्यात आले. प्रास्ताविकात यशस्विनी सामाजिक अभियानाचे संचालक विश्वास ठाकूर यांनी बचत गटातील महिलांनी पारंपरिक उद्योग व्यवसायाबरोबरच नवनवीन क्षेत्रांचा, आव्हानांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. संघटन कौशल्य, व्यवस्थापन, प्रशासकीय कौशल्य याद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. डिसेंबपर्यंत ३५६ तालुक्यांत अभियानातर्फे प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘यशस्विनी शॉपिंग फेस्टिव्हल’चे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी जिल्हा समन्वयक सुनीता निमसे, शहर समन्वयक संगीता सुराणा, गजेंद्र मेढी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज देशपांडे यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा