आदिवासी भागात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू झाले असून, मतदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिक्षक, प्राध्यापक, कृषीसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यासह महिला बचत गटांचाही आधार घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील सूचना जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरिया यांनी दिल्या. या सर्वाच्या माध्यमातून गावांमध्ये, वाडय़ा-पाडय़ांत जाऊन मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यास त्यांनी बजावले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकसभा निवडणूक २०१४’च्या अनुषंगाने पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत बकोरिया यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, अपर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज आदी उपस्थित होते. २० व २१ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रप्रमुखांनी केंद्रावर जाऊन उर्वरित मतदार नोंदणीचे अर्ज भरून घ्यावेत, विवाहानंतर स्थलांतर झालेल्या महिलांची तसेच मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
कोळदा येथील कृषी विभाग केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तसेच भारत संचार निगम यांच्या माध्यमातून युवा मतदारांना मतदानाविषयी संदेश पाठवून जागृती करावी. बस व रेल्वे स्थानकात मतदान करण्यासंदर्भातील फलक दर्शनी भागात लावावेत, असेही त्यांनी सांगितले. अद्ययावत मतदार यादी नंदुरबार जिल्ह्य़ाच्या संकेतस्थळावर टाकावी, जिल्ह्य़ातील १३९ अडचणीच्या मतदान केंद्राची पाहणी केंद्रप्रमुख, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी करून त्यांचा अहवाल सादर करावा. ज्या ठिकाणी संपर्काचे साधन नाही, अशा ठिकाणी वायरलेस, वॉकीटॉकी व सॅटेलाइट दूरध्वनीद्वारे संपर्क यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी बकोरिया यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नायक यांनी पंचायत समितीमार्फत प्रत्येक गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच वाहनांची अद्ययावत माहिती सादर करण्यात आली असून, मतदानाविषयी व मतदाराविषयीच्या माहितीपर सूचना गाव, तालुका, वाडय़ा-पाडय़ांवर पोहोचविण्यात येत असल्याची माहिती दिली.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बचत गटांचाही आधार
आदिवासी भागात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू झाले
First published on: 14-02-2014 at 08:16 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savings based groups help to increase the percent of vote